दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा, अन्यथा...; किसान सभेचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 03:45 PM2023-11-18T15:45:16+5:302023-11-18T15:45:44+5:30

राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दुध निर्मिती हेही दर कोसळण्यामागचे एक मोठे कारण आहे.

Interfere with the milk rate question, Kisan Sabha's Ajit Navale warned the government about the milk price | दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा, अन्यथा...; किसान सभेचा राज्य सरकारला इशारा

दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा, अन्यथा...; किसान सभेचा राज्य सरकारला इशारा

मुंबई - राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुधाच्या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी दर पाडले होते. आता तर सरकारी आदेशच धाब्यावर बसविण्यात आला आहे. ३४/- रुपयाऐवजी बेस रेट २७/- रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे असा आरोप किसान सभेने केला आहे.

याबाबत किसान सभेचे डॉ. अजित नवले म्हणाले की, दुधाच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जाहीर केले होते असं त्यांनी म्हटलं.

यानुसार दुधाला ३४/- रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र राज्यात सणासुदीच्या काळात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई निर्मितीसाठी दुधाची मागणी वाढली. त्यात दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले. मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दुध दर वाढायला पाहिजे होते. मात्र या उलट मागणी कमी व उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दुध कंपन्यांचा हा दर पाडण्यासाठी केलेला कांगावा आहे. शिवाय या सोबतच राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दुध निर्मिती हेही दर कोसळण्यामागचे एक मोठे कारण आहे. जोडीला सदोष मिल्कोमीटर व वजनकाट्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लुटमार नित्याची बाब आहे असा आरोप किसान सभेने केला.

दरम्यान, भेसळयुक्त दुध नियंत्रणाची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाकडे आहे. वजनकाटे व मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी वजनकाटे वैधतामापन विभागाकडे आहे. दोन्ही विभाग ‘मनुष्यबळाचा अभाव’ हे कारण देत आपली जबाबदारी झटकत आले आहे. अशा पार्श्वभूमीवर दुध भेसळ, वजनकाटे आणि मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी संबंधित विभागांकडून काढून घेऊन दुग्धविकास विभागाकडे दिल्यास याबाबतचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने याबाबत तसा निर्णय करावा तसेच दुधदर निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीस कायदेशीर वैधता द्यावी, या समितीची दर शिफारस दुधसंघ व दुध कंपन्यांवर बंधनकारक करावी, गायीच्या दुधाला किमान ३५/- रुपये दर मिळेल यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. जर हे केले नाही तर रस्त्यावर आंदोलन करू असा इशाराही किसान सभेने दिला आहे.

Web Title: Interfere with the milk rate question, Kisan Sabha's Ajit Navale warned the government about the milk price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध