सीईटी परीक्षेत चुकीचे पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण विभाग घेणार दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:02 PM2019-06-17T12:02:13+5:302019-06-17T12:07:21+5:30
एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे..
पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात आली,मात्र,परीक्षेचा निकाल जाहीर करताना काही विद्यार्थ्यांना चुकीचे पर्सेंटाईल दिले असून प्रवेश परीक्षा कक्षाकडे याबाबत तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.परंतु, तंत्र शिक्षण विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांची दखल घेतली जाईल,असे विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पर्सेंटाईल पध्दत तांत्रिक दृष्ट्या बरोबर असली तरी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करताना पीसीएम ग्रुप मधील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचे मत प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.त्यातच आता काही विद्यार्थ्यांना 2 पर्सेंटाईल,32 पर्सेंटाईल गुण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रवेश परीक्षा कक्षाकडे तक्रार करूनही विद्यार्थी व पालकांना दाद मिळत नाही.त्यामुळे इंजिनिअरिंग,फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून या विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाकडे चुकीचे पर्सेंटाईल मिळाल्याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र,कक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांकडून केला आहे. पर्सेंटाईलवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार की गुणांच्या आधारे प्रवेश देणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे कक्षातील कर्मचा-यांकडून पालकांना सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना 2 किंवा 31 पर्सेंटाईल मिळूच शकत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेत 100 ते 125 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेले पर्सेंटाईल चूकीचे आहेत,असाही दावा पालक करत आहेत.
----------------------
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला आहे.तंत्र शिक्षण विभागाने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. तसेच विद्यार्थ्यांना चुकीचे पर्सेंटाईल मिळाल्याची कोणतीही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नाही. तक्रार प्रात्र झाल्यास त्याची दखल घेवून प्रवेश परीक्षा कक्षाकडे संबंधित तक्रार पाठविली जाईल.तसेच कक्षाकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्या निश्चितच निकाली काढल्या जातील. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याची काळजी विभागाकडून घेतली जाईल.
- अभय वाघ,संचालक ,तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य