नकली खतांचे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय
By admin | Published: June 26, 2014 12:45 AM2014-06-26T00:45:40+5:302014-06-26T00:45:40+5:30
अमरावती जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पकडण्यात आलेले नकली रासायनिक खत मध्यप्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले. भंडारा जिल्ह्यात नकली कंपनीच्या नावानेच पॅकिंग करण्यात आले
गजानन मोहोड /अमरावती
अमरावती जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पकडण्यात आलेले नकली रासायनिक खत मध्यप्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले. भंडारा जिल्ह्यात नकली कंपनीच्या नावानेच पॅकिंग करण्यात आले आणि विदर्भाच्या ग्रामीण भागात डिल्पी, एसएसपी नावाने विकल्या जात असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील मुर्तिजापूर (तरोडा) ग्रामपंचायतीच्या गोदामात धाड घालून कृषी विभागाने बनावट खते जप्त केली होती. ‘भुसील सिलॉकॉन ६५ टक्के अॅग्रोकेमिकल्स, पेट्रोलपंपजवळ (ठाणा) जि. भंडारा’ असा पत्ता अंकित असलेल्या बनावट रासायनिक कंपनीच्या एस.एस.पी. (सिंगल सुपर फॉस्फोट) नावाने कृषी खताची ग्रामीण भागात विक्री होत आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील आसरा येथे डीएपी या नावाखाली भुवरदान (दानेदार) अॅग्रोकेमिकल्स, भंडारा असे छापले असलेल्या बनावट रासायनिक खताच्या ६४ बॅगा १००० रुपये प्रतिबॅगप्रमाणे विकण्यात आल्या. तसेच गावात आगाऊ बुकिंग करुन हजारो रुपये जमा करण्यात आले. ही माहिती मिळताच कृषी विभागाने आणखी माल पाहिजे, असे सांगून या कंपनीच्या फिल्ड आॅफिसरला शिताफीने बोलावून त्याला पकडण्यात यश मिळविले. मयूर देशपांडे (रा. भंडारा) असे त्याचे नाव आहे. दुसरा सुमित मेश्राम (रा. अमरावती) हा पसार झाला.अटकेतील आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर या बनावट कंपनीचा फिल्ड आॅफिसर असे भासवून कृषी खतांची विक्री केल्याचे सांगितले. त्याच्या माहितीवरुन तिवसा तालुक्यातील मूर्तिजापूर (तरोडा) येथील गोदामावर कृषी विभागाने धाड घालून बनावट एसएसपी नावाच्या १०० बॅग जप्त केल्या आहेत. गावातील काही शेतकऱ्यांना त्याने या खताची विक्री केल्याचे सांगितले.
याप्रकरणी भातकुली व तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.