बिनचूक निकालासाठी आता ‘इंटर्नल मार्क्स एंट्री’ सॉफ्टवेअर
By admin | Published: October 22, 2014 12:17 AM2014-10-22T00:17:58+5:302014-10-22T00:23:52+5:30
शिवाजी विद्यापीठ : संगणक केंद्राचा उपक्रम, सर्व विभागांत वापर होणार
कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तत्सम अंतर्गत गुण देण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर व पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संगणक केंद्राने इंटर्नल मार्क्स (अंतर्गत गुण) एंट्री सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील, तर पुढील टप्प्याटप्प्यांत सर्व परीक्षांच्या निकालासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे.
विद्यापीठाच्या संगणक केंद्राने ‘इंटर्नल मार्क्स एंट्री’ या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. सर्व माहिती भरल्याची खातरजमा झाल्यानंतर अंतिम माहितीची खात्री करण्याची जबाबदारी प्राचार्यांवर राहणार आहे. त्यामुळे यंत्रणेतील प्रत्येक टप्प्यावर गुण भरल्याची पडताळणी होईल. महत्त्वाचे म्हणजे आॅनलाइन गुण भरण्याच्या या प्रक्रियेला विशिष्ट कालमर्यादा घालून दिली जाईल. निश्चित केलेल्या दिवशी ही लिंक आपोआपच बंद होणार असल्याचे विद्यापीठाच्या संगणक केंद्र संचालक स्वाती खराडे यांनी सांगितले. दरम्यान, या सॉफ्टवेअरची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. सावंत, डॉ. के. रवी, दीपक मधुकर, एस. आर. पावसकर, एम. जी. देवमाने, पी. एस. पाटील, अभियांत्रिकी अभ्यास मंडळ सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, रजिस्ट्रार व कर्मचारी उपस्थित होते. उपकुलसचिव डॉ. पी. एस. पांडव यांनी प्रास्ताविक केले. बी. ए. किणीकर यांनी आभार मानले.
असे आहे सॉफ्टवेअर
विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची परीक्षापूर्व माहिती (डाटा) उपलब्ध असते. ती ज्या-त्या महाविद्यालयाला संगणक केंद्रामार्फत इंटरनेटद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. या सर्व माहितीचे नियंत्रण व व्यवस्थापन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सोपविण्यात येणार आहे. प्राचार्यांना या सॉफ्टवेअरवरून स्वतंत्र लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला जाईल. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विषयाच्या अधिविभागप्रमुखांवर त्यांच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात येईल. अधिविभाग प्रमुखांमार्फत अंतर्गत परीक्षांसाठी परीक्षक नियुक्त करण्यात येत असतात. त्या परीक्षकांकडून प्रात्यक्षिक, अंतर्गत परीक्षांचे गुण ज्या-त्या विद्यार्थ्याच्या आॅनलाइन प्रोफाइलमध्ये भरणे आवश्यक असेल. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती भरल्याखेरीज हे निकालपत्रक सिस्टीमकडून सबमिट करवून घेतले जाणार नाही.