मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

By अतुल कुलकर्णी | Published: June 11, 2019 07:57 PM2019-06-11T19:57:28+5:302019-06-11T20:17:34+5:30

महाराष्ट्रात अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.

Internal rift in Shiv sena & BJP on Maharashtra CM Post | मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

Next

 - अतुल कुलकर्णी
 
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सेना युती करताना राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करायचे आणि ज्याचे सदस्य जास्त त्याने पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे, नंतरची अडीचवर्षे दुस-या पक्षाकडे हे पद जाईल, असे ठरलेले असताना भाजपचे मंत्री विनाकारण वेगवेगळे मुद्दे पुढे करत आहेत, मात्र महाराष्ट्रात  अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे जाहीर केल्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तीच री नाशिकला ओढली. त्याआधी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३५/१३५ जागा दोघांनी लढवायच्या व बाकीच्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या असा फॉर्म्युला जाहीर केला. त्यावर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ट्विट   करत यात भर घातली आहे. ते म्हणतात, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीत हजर नसणा-यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.’’ याचे शिवसेनेकडून कोणीही खंडन केलेले नाही. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव आहेत व युवा नेते आदित्य ठाकरेच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे शिवसेनेने असे टष्ट्वीट करुन त्याची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या सगळ्यात दोन्ही पक्षात पडद्याआड खदखद असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला स्पष्ट बहूमत मिळेल याचे नियोजन केल्याचे त्यांचे नजीकचे सांगतात. भाजपला विजय मिळू शकणा-या पण शिवसेनेकडे असलेल्या जागांवर अपक्ष म्हणून किंवा मित्र पक्षाच्या नावाखाली अन्य उमेदवारांना निवडून आणायचे व नंतर त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, असे नियोजन करणे सुरु झाले आहे. काहीही करुन भाजपने १४५ च्या पुढे एकट्याच्या बळावर जायचे जेणे करून शिवसेना सोबत असल्या नसल्याचा फरकच पडणार नाही, अशी रणनीती आखण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारात शिवसेनेची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

Web Title: Internal rift in Shiv sena & BJP on Maharashtra CM Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.