२०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 08:35 AM2023-10-18T08:35:18+5:302023-10-18T08:35:52+5:30

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे

International Cruise Terminal to be built in Mumbai by 2024; 61 thousand crore new port | २०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

२०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

मुंबई- ३ दिवसीय ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समिटची मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. महाराष्ट्रातील समुद्री व्यापार पाहता समिटच्या पहिल्याच दिवशी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने मुंबईनजीक पालघरच्या वाढवणमध्ये ६१ हजार कोटींचं बंदर उभारण्यासाठी MOU केला आहे. वाढवण बंदर तयार करण्यासाठी ३ कंपन्यांसोबत हा करार केला आहे. त्यात १-१ किलोमीटरचे एकूण ९ टर्मिनल असतील. वाढवण बंदरामुळे राज्याचा आर्थिक फायदा तर होणारच परंतु त्याचसोबत हजारोंनी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे. जेएनपीटीनंतर राज्यात आणखी एक बंदर निर्मितीनंतर समुद्रीमार्गे व्यापाराला दुप्पट चालना मिळेल अशी आशा आहे. या समिटचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यात सागरी व्यापाराचा मोठं योगदान असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

समुद्र किनारे, बंदरे, नवीन जलमार्ग आणि देशातच जहाज निर्माण होत आहेत. समुद्री पर्यटक आणि देशात येणाऱ्या क्रूझची संख्या सातत्याने वाढत आहे. लवकरच भारत जगातील क्रूझ हब होणार आहे. मुंबईत बनणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचा त्यात मोठा वाटा असेल. मंगळवारी पंतप्रधानांनी २३ हजार कोटींच्या सागरी प्रकल्पांचे उद्धाटन केले. ब्लू इकॉनॉमीची दीर्घकालीन ब्लू प्रिंट जारी करण्यात आली असून सुमारे ४५०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या टुना-टेकरा टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणात करण्यात आली. हे ग्रीनफिल्ड टर्मिनल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) प्रक्रियेअंतर्गत विकसित केले जाईल. मोदींनी सागरी क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसाठी सुमारे ७.१६ लाख कोटी रुपयांचे ३०० हून अधिक सामंजस्य करार (एमओयू) केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य मते, मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल २०२४ पर्यंत प्रवाशांसाठी तयार होईल. या टर्मिनलवर दरवर्षी सुमारे २०० क्रूझ जहाजे येण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२२-२३ मध्ये जेएनपीटी हे जगातील टॉप ३० बंदरांपैकी एक राहिले आहे. त्याचवेळी मुंबई बंदराच्या क्रूझ टर्मिनलवरून शेकडो विदेशी पर्यटक येथे दाखल झाले.

Web Title: International Cruise Terminal to be built in Mumbai by 2024; 61 thousand crore new port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.