पालिका शाळांतून घडताहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू
By admin | Published: August 3, 2016 02:41 AM2016-08-03T02:41:39+5:302016-08-03T02:41:39+5:30
महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही खो - खोसह मॅरेथॉनमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू लागले आहेत.
नवी मुंबई : महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही खो - खोसह मॅरेथॉनमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू लागले आहेत. पावसाळ्यामध्येही या खेळाडूंचा सराव थांबू नये यासाठी राबाडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयामध्ये इनडोअर स्टेडियम तयार केले आहे. रविवारीही खेळाडूंसाठी शाळा सुरू ठेवली जात आहे.
ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने गोल्ड मेडल मिळविले. यामध्ये महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू विद्यालयामध्ये सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अश्विनी प्रभाकर मोरे या खेळाडूची कामगिरीही महत्त्वाची ठरली. राबाडा येथील निब्बाण टेकडी झोपडपट्टीत राहणारी ही विद्यार्थिनी जिद्द व मेहनतीच्या बळावर देशपातळीवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. याशिवाय राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांमध्येही यश मिळवत आहे. अश्विनीप्रमाणे पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे निकिता धुमाळ, कांचन हलंगरे, शीतल ओहाळ, साधना गायकवाड, आरती काटे, रोहित काटे या खेळाडूंनी महापौर चषक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्याच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. काटे, संकेत जाधव, सुफियान शेख, ऋषिकेश गायकवाड व इतर अनेक खेळाडू विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत. गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या या विद्यार्थ्यांना महापालिकेने व्यासपीठ मिळवून दिले आहे. महापालिका शाळेतील खेळाडूंचे प्रशिक्षण पावसाळ्यात थांबू नये यासाठी राबाडा शाळेत खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे खो - खोसाठी इनडोअर स्टेडियम तयार केले आहे. याशिवाय इमारतीची रचना मॅरेथॉनचा सराव करणाऱ्या मुलांना उपयोगी होईल अशी केली आहे. याशिवाय राज्यस्तरावर खो-खो खेळणाऱ्या अनुराधा कामठे, श्रद्धा फटाळे व इतर खेळाडूही याच शाळेत प्रशिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी तीन ते चार किलोमीटर अंतर पायी किंवा सायकलवरून येवून खेळाचा सराव करत आहेत. ठाणे, मुंबई, रायगड परिसरातील मॅरेथॉन स्पर्धेमध्येही हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. (प्रतिनिधी)
>महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. दहा वर्षांपासून राजर्षी शाहू विद्यालयामध्ये खेळांवर विशेष लक्ष दिले जात असल्यामुळे येथील मुले खो -खो व मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत.
- सुधाकर सोनावणे, महापौर