आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली
By admin | Published: February 19, 2016 03:32 AM2016-02-19T03:32:31+5:302016-02-19T03:32:31+5:30
आम्ही कलाकुसरीचे साहित्य आमच्याच गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विकत होतो. शहरात जाण्याची संधी क्वचितच मिळत असे
मुंबई : ‘आम्ही कलाकुसरीचे साहित्य आमच्याच गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विकत होतो. शहरात जाण्याची संधी क्वचितच मिळत असे. कलाकुसरीचे साहित्य राज्याबाहेर विक्रीसाठी न्यायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत होती. प्रदर्शन भरावण्यात आर्थिक अडचणी येत होत्या. ‘मेक इन इंडिया’ने हे सर्व अडथळे दूर केले, आमच्या कलेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ खुली झाली, अशा शब्दांत कलाकार आणि व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले.
सप्ताहात सहभागी झालेल्या कलाकार व व्यवसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. दगडांचे शिल्प बनविणारे तामिळनाडूमधील देव राज शिल्पी म्हणाले, ‘या सप्ताहामुळे मुंबईत कला सादर करण्याची संधी मिळाली. विविध राज्यातील कलाकरांशी संवाद साधता आला.’ मातीची भांडी बनविणारे ठाणे येथील कलाकार बी. आर. पंडित यांनी कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणाऱ्या तामिळनाडूमधील थंगा जोथी यांनी आर्थिक राजधानीत विविध प्रकारचे ग्राहक भेटल्याचे नमूद केले. येवला येथील पैठणीकार रमेश सिंग रामसिंग परदेसी यांनी पैठणीला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अलंकार बनविणाऱ्या आसाममधील महिला व्यवसायिकांनी दालनाला लाखो प्रेक्षकांनी भेट दिल्याचे सांगितले. नवे ग्राहक जोडले गेल्याबद्दल, नव्या कल्पना कल्पना सूचल्याबद्दल आणि मोठे व्यासपीठ मिळाल्याबद्दल बहुतेक उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.
धातूपासून कलाकुसरीची भांडी बनविणारे दिल्ली येथील हाजी नसरुद्दीन यांनी देशभरातील कलाकरांसह उद्योजकांशी संवाद साधता आल्याने नव्या कल्पना सुचल्याचे सांगितले. लाकाडावर कलाकुसर करणारे दिल्लीमधील इर्शद फारुकी यांनीही राज्याबाहेरील ग्राहक जोडले गेल्याचे सांगितले.शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, औद्योगिक संस्थांचे प्रशिक्षणार्थी, प्रतिनिधींनी सप्ताहाला भेट दिली. ‘स्कील इंडिया आणि स्टार्टअप इंडिया’ या दालनातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी होती. आयआयटी पॅव्हेलियन, इंडिया डिझाईन शो, इंडियन स्कूल आॅफ डिझायन अँड इनोव्हेशन ही दालने विद्यार्थ्यांना आकर्षित करत होती.
आॅटोमोबाइल्स, अवकाश व संरक्षण, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स, बांधकाम यंत्रसामग्री, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक साहित्य आणि यंत्रसामग्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योगांच्या दालनांना भेटी देणाऱ्या नागरिकांनी सप्ताहाबाबत समाधान व्यक्त केले. ज्ञानात भर पडल्याचे आणि विविध शैक्षणिक संस्थांची माहिती मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. शेवटच्या दिवशी गर्दी ओसंडून वाहत होती.