आंतरराष्ट्रीय रक्तचंदन तस्करांचा विळखा
By admin | Published: February 28, 2017 04:47 AM2017-02-28T04:47:56+5:302017-02-28T04:47:56+5:30
जेएनपीटी बंदरात गेल्या १० वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत
मधुकर ठाकूर,
उरण- जेएनपीटी बंदरात गेल्या १० वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे बंदर संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडला आहे.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील १० वर्षांत विविध ठिकाणी आणि काही कंटेनर गोदामावर धाडी टाकून एक हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अब्जावधी रुपये आहे. या विविध प्रकरणांत काही आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. शिवाय मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप तरी तपास यंत्रणेचे हात पोहोचलेले दिसत नाहीत. परिणामी, मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याने रक्तचंदनाची जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहे.
जेएनपीटी बंदरातून शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ, सापाची कातडी यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. आठ वर्षांपासून या तस्करीमध्ये रक्तचंदनाची भर पडली आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. देशात या दुर्मीळ रक्तचंदनाच्या एका किलोची किंमत साधारणत: ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे. तर परदेशात रक्तचंदन १५० ते २०० डॉलर प्रति किलोच्या भावाने विकले जाते.