वाघांच्या वाढत्या शिकारी चिंताजनक - किशोर रिठे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 09:32 AM2017-07-29T09:32:57+5:302017-07-29T09:34:28+5:30
विदर्भात वाघांना "अच्छे दिन" आले असतानाच वाघांच्या वाढत्या शिकारी हा अत्यंत चिंताजनक विषय झाला आहे.
नागपूर, दि. 29 - विदर्भात वाघांना "अच्छे दिन" आले असतानाच वाघांच्या वाढत्या शिकारी हा अत्यंत चिंताजनक विषय झाला आहे. जंगलात उघड्यावर पडलेले बछडे दिसल्यानंतर वाघिणीची हत्या झाल्याचे निदर्शनास येणे, शिकाऱ्यांच्या सापळ्यातून सुटका झालेले वाघ दिसून येणे, लोखंडी सापळ्यात मृत्युमूखी पडलेले वाघ दिसून येणे, रेडिओ कॉलर लावलेले वाघ बेपत्ता होणे आणि तस्करांकडून वाघाची हाडे, नखे जप्त होणे या सर्व घटना स्थानिक व बाहेरील शिका-यांकडून विदर्भात सातत्याने शिकारी होत असल्याचे सांगणाऱ्या आहे.
यावर महाराष्ट्र शासनाने गंभीरपणे विचार करून ठोस पावले उचलण्याची वेळ येवून ठेपली आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य तसेच महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्व संध्येला केले. आज जागतिक व्याघ्र दिन साजरा होत आहे. या दिवशी व्याघ्र संवर्धनावर विचार विमर्श होऊन पुढील दिशा ठरावी तसेच जनजागरण व्हावे हा उद्देश असतो. यावर्षीच्या व्याघ्र दिनाच्या पूर्व संध्येला विदर्भातून गायब झालेल्या जय सारख्या वाघांचे सावट असतानाच श्रीनिवास या वाघाचा वीजप्रवाह देवून घेतलेला क्रूर बळी आणि यामुळे वाघांच्या सुरक्षित असण्याबाबत वन विभागाने व भारतीय वन्यजीव संस्थेने केलेले फोलपट दावे सिद्ध झाले आहे.
बेपत्ता वाघ:
1)१५ एप्रिल २०१२ च्या आसपास भिवापूर नजीकच्या तासच्या वाघीणीला लावलेल्या रेडीओ कॉलरने जी. पी. एस प्रणाली बंद झाल्याने ध्वनीलहरी देणे बंद केले. तिचे व्ही. एच. एफ. चालू असले तरी त्याद्वारे तिचे ठिकाण जी. पी. एस प्रमाणे अगदी अचूकपणे कळणे कठीण होवून बसले. त्यामुळे ती गायब झाली. पण वाघांना लावलेल्या रेडीओ कॉलर बंद पडण्याचा हा प्रकार यापुढेही सुरु राहिला. याचा फटका जय या प्रसिद्ध वाघाला बसला.
2) जयचा जन्म नागझिराच्या जंगलात झाला असला तरी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याने नागझिरा ते काऱ्हान्डला असा आपला संचारमार्ग चोखाळला होता. परंतू ९ मे २०१५ नंतर जय दिसला नव्हता. त्याचे जी. पी. एस आणि रेडीओ सिग्नल मिळत नव्हते. त्यामुळे त्याच्या शोधात नागझिरा, नवे नागझिरा, ताडोबा, उमरेड काऱ्हान्डला, पेंच व कोका हे अभयारण्य पिंजून काढण्यात आलेत. उमरेड, चंद्रपूर, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, ब्रम्हपुरी पवनी, अड्याळ या तालुक्यांमधील सुमारे ४०० गावांमध्ये जयचा शोध घेण्यात आला. पण जय सापडला नाही.
3) जय या वाघाच्या बेपत्ता होण्यासोबतच श्रीनिवास व चांदी या वाघिणीच्या तीन बाछड्यांच्या बेपत्ता होण्याच्याही अफवा उडाल्या. पुढे २० एप्रिल २०१७ रोजी श्रीनिवास वाघाच्या गळ्याची रेडीओ कॉलर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागातील नागभीड नजीक मिळाली. त्या ठिकाणानजीकच श्रीनिवास वाघाचा जमिनीत पुरलेला मृतदेहही मिळाला. एका शेतकऱ्याने आपणच या वाघाला वीजप्रवाह देवून मारल्याची कबुलीही दिली. हे दोन्ही वाघ सुरक्षित असावे असे आतापर्यंत छातीठोकपणे सांगणारे देहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे तज्ञही श्रीनिवासचा गाडलेला मृतदेह पाहून अबोल झाले.
4) २७ डिसेंबर २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात भुकेने व्याकूळ वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाला. पाथरी येथून सात कि. मी. अंतरावर असलेल्या आसोलामेंढा तलावाच्या उपकालव्याजवळ वीरखल येथे गोसीखुर्द कालवा ओलांडतांना सकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांना वाघिणीची तीन पिल्ले दिसली. यातील दोन पिल्ले आधीच मृत्युमूखी पडली होती. तर इतर एक पिल्लू मरणासन्न होते.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध मोहीम राबविली असता त्यांना पाथरी वनपरिक्षेत्राच्या वनखंड क्रमांक १६६ मध्ये आणखी एक बछडे जिवंत अवस्थेत सापडले. ही चार पिल्लांची वाघीण या परिसरात असल्याचे अधिकाऱ्यांना माहीतच नव्हते. त्यामुळे ही पिल्ले सापडल्यावर वाघिणीची शोध मोहीम हाती घेण्यात आली. परंतू त्यात वनविभागाला यश मिळू शकले नाही.
5) ४ सप्टेंबर २०१६ मध्ये नागभीड तालुक्यातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या तळोधी (बाळापुर) च्या जंगलात वनखंड क्रमांक ७३ मध्ये एक वाघीण मृतावस्थेत सापडली. तिच्या मृत्यूचे डॉक्टरांना नेमके कारण कळू शकले नाही. या वाघिणीला साधारणतः आठ महिने वयाचे ३ बछडे सुद्धा होते. परंतू आईच्या मृत्यूनंतर ते बेपत्ता झाले. यामुळे महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या वनक्षेत्रात जवळपास ५० कॅमेरा ट्रेप लावून शोध घेतला. परंतू हे बछडे सापडले नाहीत.
सातपुडा फाउंडेशन यावर खालील उपाययोजना सुचवीत आहे की काय केले पाहिजे ?
१)सिंहांच्या शिकारी थांबविणारी यंत्रणा जशी गुजराथ राज्यात उभारण्यात आली त्याच धर्तीवर महाराष्ट्रात व विशेषतः विदर्भात यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
२)मेळघाट व्याघ्र प्रकल्पात काही वर्षांपूर्वी उभारलेला वन्यजीव शिकारी पकडणारा सायबर सेल आणखी व्यापक स्वरुपात राज्य स्तरावर उभारण्याची गरज आहे.
३)पोलीस, कस्टम्स व वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो यांच्या मदतीने वनविभागाच्या या स्वतंत्र सेलने २४ तास काम करणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे .
४)न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करणारी स्वतंत्र यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर (विभागवार) उभी करण्याची गरज आहे.
५)बाहेरील राज्यांमधून महाराष्ट्रात शिरणाऱ्या संघटीत शिकाऱ्यांना (बहेलिया ,बावरिया ई.)स्थानिक शिकाऱ्यांकडून मिळणारे सहकार्य तोडण्याची व्यवस्था निर्माण करणे
किरण रिठे, सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष