केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचीच विमानतळावर कोरोना तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:43 AM2020-03-13T04:43:32+5:302020-03-13T04:43:49+5:30
सर्व प्रवाशांची तपासणी करण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी व्यक्त केले मत
मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या भारतात व महाराष्ट्रात वाढू लागल्याने देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीदेखील विमानतळावरकोरोना तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र, अशा प्रकारे पाहणी करण्यासंदर्भात दिल्लीहून कोणतेही आदेश न आल्याने देशांतर्गत विमानतळावर तपासणी केली जात नसल्याचे विमानतळ प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील १५ देशांमधून येणाºया प्रवाशांना वेगळे करून त्यांची तपासणी केली जात आहे. अमेरिका, स्पेन, फ्रान्स, चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, थायलंड, इराण, इटली, नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर या १५ देशांतून येणाºया प्रवाशांना वेगळे करून त्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मास्क व हातमोजे घालण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवारी ९८ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांतील १० हजार ५४० प्रवाशांची तपासणी केल्याची माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देशांतर्गत विमान प्रवास करणाºया प्रवाशांना विमानतळावर जंतुनाशकांची सुविधा पुरवली नसल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला असून, सर्वच प्रवाशांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.