आंतरराष्ट्रीय टोळी पकडली
By Admin | Updated: December 10, 2014 00:47 IST2014-12-10T00:47:56+5:302014-12-10T00:47:56+5:30
विमा पॉलिसीवर ५० लाखांचे बोनस लागल्याची बतावणी करून पॉलिसीधारकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून साडेबारा लाख

आंतरराष्ट्रीय टोळी पकडली
साडेबारा लाखांचा ऐवज जप्त : उमरेड पोलिसांची कामगिरी
नागपूर : विमा पॉलिसीवर ५० लाखांचे बोनस लागल्याची बतावणी करून पॉलिसीधारकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून साडेबारा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
अमित अशोक गुप्ता (रा. इतवारी पेठ उमरेड) यांना आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या विमा पॉलिसीवर ४७ लाख ५० हजारांचा बोनस मिळणार असल्याचा एक फोन आणि ई-मेल आला. त्यामुळे गुप्ता यांचा विश्वास बसला. बोनसची ही रक्कम खात्यात जमा करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या करापोटी २४ लाख रुपये जमा करावे लागेल, असे आरोपींनी सांगितले होते. त्यानुसार गुप्ता यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या खात्यात २३ लाख ३६ हजारांची रक्कम जमा केली. नंतर ते ४७ लाख ५० हजार रुपये (बोनस) जमा होण्याची वाट बघू लागले. ते काही जमा झाले नाही. गुप्ता यांच्याशी अविनाश शर्मा, यशवंत गांधी, अविनाशकुमार राव, आर. के. राव. मि. राव अशी वेगवेगळी नावे सांगितली होती. हे सर्व आरोपी प्रत्येक वेळी नवे कारण सांगून गुप्ता यांना रक्कम मागत होते. ते बनवाबनवी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे गुप्ता यांनी २४ एप्रिलला उमरेड ठाण्यात तक्रार नोंदवली होती. प्रकरण गुंतागुंतीचे असल्यामुळे उमरेड पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांना या गुन्ह्याची माहिती कळवली. आरोपींनी केलेले फोन आणि मेल तसेच बँक खात्याचा अहवाल काढला असता आरोपी दिल्ली, नोएडा, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान स्वीकारून डॉ. आरती सिंग यांनी स्वत:च या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवली.