आंतरराष्ट्रीय महिला धावपटूला चोरट्याचा खो, सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात भाविकांसोबत चोरटेही शिरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 09:34 PM2017-10-08T21:34:34+5:302017-10-08T21:34:53+5:30
आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता सुधीर बेहरे - नायगावकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने बेमालूमपणे लंपास केले. सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदीरात रविवारी दुपारी ही चोरीची खळबळजनक घटना घडली.
नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता सुधीर बेहरे - नायगावकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने बेमालूमपणे लंपास केले. सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदीरात रविवारी दुपारी ही चोरीची खळबळजनक घटना घडली. बेहरे नायगावकर यांना नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान आहे.
संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून चारूलता आणि त्यांचे पती सुधीर आज दुपारी २ च्या सुमारास श्री टेकडी गणेश मंदीरात दर्शनाला गेले. तेथे दर्शन आॅटोपल्यानंतर चारुलता यांचा सहज गळ्यावर हात गेला. यावेळी त्यांना त्यांचे मंगळसूत्र दिसले नाही. त्यांनी ही बाब पतीला सांगितली. चुकून ते घरीच राहिले असावे, असा समज करून त्या त्यांच्या जयप्रकाश नगरातील गौरीसूत अपार्टमेंटमध्ये पोहोचल्या. त्यांनी आपल्या घरात शोधाशोध केली. मात्र, मंगळसूत्र दिसले नाही.
संकष्टी चतुर्थी निमित्त आज श्री टेकडी गणेश मंदीरा भाविकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने चारुलता यांचे मंगळसूत्र लंपास केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या सीताबर्डी ठाण्यात पोहचल्या. त्यांनी उपनिरीक्षक स्थूल यांच्याकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर लगेच चारूलता यांना घेऊन श्री गणेश टेकडी मंदीर गाठले. पोलिसांनी येथे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, सीसीटीव्हीतून काही हाती लागले नाही.
अनेकांची ठाण्यात धाव
चारुलता बेहरे-नायगावकर रेल्वेत सेवारत आहेत. त्यांचे १० ग्रामचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याचे कळताच त्यांच्या अनेक सहका-यांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.