International Yoga Day 2018 : मनपा शाळेचे सव्वा लाख विद्यार्थी करणार ‘योग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:30 AM2018-06-21T02:30:42+5:302018-06-21T02:30:42+5:30
२१ जून रोजी साजऱ्या होणा-या आंतरराष्ट्रीय योग दिनाचीही जय्यत तयारी महापालिकेने केली आहे.
मुंबई : २१ जून रोजी साजऱ्या होणा-या आंतरराष्ट्रीय योग दिनाचीही जय्यत तयारी महापालिकेने केली आहे. या अंतर्गत महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग या व्यायाम प्रकारातील प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर ४४ ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत योगासने केली जाणार आहेत. या वर्षी महापालिका शाळांमधील सुमारे सव्वा लाख विद्यार्थी व १५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्रितपणे सलग ४५ मिनिटे योग व्यायाम प्रकारातील विविध आसनांची प्रात्यक्षिके करून, आंतराराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारित केल्यानुसार, वर्ष २०१५ पासून दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतराराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. महापालिकेच्या शाळांमध्येदेखील वर्ष २०१५पासूनच योग दिन साजरा केला जातो. योग हा शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग असल्याने, मनपा शिक्षण खात्याच्या शारीरिक शिक्षण उपविभागातील सर्व ३१७ शिक्षकांनी या वर्षीचा योग दिन अधिक प्रभावीपणे साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे. याच ३१७ शिक्षकांपैकी ६० शिक्षकांनी सांताक्रुझ येथील द योग इन्स्टिट्यूट या शतक महोत्सव साजरा करणाºया व शासन मान्यताप्राप्त असणाºया संस्थेतून योगाचे विशेष प्रशिक्षण प्राप्त केले आहे, तसेच याच ६० शिक्षकांनी नंतर आपल्या २५७ शिक्षक सहकाºयांनादेखील योगाचे धडे दिले आहेत. आता हे सर्व ३१७ शिक्षक गुरुवारी साजºया होणाºया योग दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
>५ हजार विद्यार्थी करणार योग
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुवारी पतंजली योगपीठाने सकाळी ६ वाजता गेट वे आॅफ इंडिया येथे योग शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात मुंबईतील तब्बल ५ हजार विद्यार्थी सामील होतील, असा दावा पतंजली योग समितीने केला आहे. सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान पार पडणाºया योग शिबिरात खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार राज के पुरोहित सामील होणार आहेत.
>४५ मिनिटे योगाभ्यास
सध्या पावसाळा असल्याने महापालिकेच्या सर्व शाळांमधील सभागृहात किंवा मोठ्या वर्गखोल्यांमध्ये योग दिनाचे आयोजन केले जाणार आहे.
महापालिकेच्या शाळा या तीन सत्रांमध्ये भरत असल्याने, त्यानुसार योग दिनाचे आयोजनदेखील तीन सत्रांमध्ये केले जात आहे.
यानुसार, पहिल्या सत्राच्या सुरुवातीला म्हणजेच, सकाळी ८ वाजता योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दुसरे सत्र सकाळी १०.३० वाजता; तर तिसरे सत्र हे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.यानुसार, तिन्ही सत्रांच्या सुरुवातीला सलग ४५ मिनिटे योगाभ्यास केला जाणार आहे.
योग या व्यायाम प्रकाराचा समावेश अभ्यासक्रमातच असल्याने, योग दिनानंतरदेखील मनपा शाळांमध्ये नियमितपणे योगासनांचा सराव करून घेतला जातो.
>उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुंबईत आज योग दिवसाचे आयोजन
आंतराष्ट्रीय योगा दिनानिमित्त वांद्रे पश्चिम येथील ‘योग गार्डन’ येथे गुरुवारी ६.४५ वा. आयोजित कार्यक्रमास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयो, खासदार पुनम महाजन यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पालिका आयुक्त अजय महेता यांच्यासह मुंबईकरांची २४ तास सेवा करणारे महापालिका आणि पोलीस कर्मचारी योगा करणार आहेत.