International Yoga Day 2018 : आॅनलाइन पाहा, योगासने करा, घरच्या घरी फिटनेस फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:05 AM2018-06-21T02:05:46+5:302018-06-21T02:05:46+5:30
कुटुंबाचे दिवसभराचे वेळापत्रक, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, शाळांच्या वेळा, मुलांचा अभ्यास, घरकामांची जबाबदारी असा डोलारा सांभाळताना गृहिणींच्या नाकी नऊ येतात.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कुटुंबाचे दिवसभराचे वेळापत्रक, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, शाळांच्या वेळा, मुलांचा अभ्यास, घरकामांची जबाबदारी असा डोलारा सांभाळताना गृहिणींच्या नाकी नऊ येतात. या सर्व व्यापामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मात्र, यावर गृहिणींनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. मोकळ्या वेळामध्ये इंटरनेटवर विविध व्हिडिओ पाहून, अॅप्सच्या माध्यमातून योगासने, तसेच व्यायामप्रकार पाहून त्याचे अनुकरण करण्याकडे महिलांचा कल वाढतो आहे.
सध्याचे युग इंटरनेटचे आहे. एका क्लिकवर जगभरातील कोणतीही माहिती मिळवणे सहजशक्य झाले आहे. बदलत्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. महिलाही याबाबतीत मागे नाहीत. एखाद्या पदार्थाच्या रेसिपीपासून योगासने शिकण्यापर्यंत अनेक उपयुक्त बाबींसाठी इंटरनेटचा वापर केला जातो. आपल्या सोयीच्या वेळेत विविध व्हिडिओ पाहून योगासने करण्याचे महिलांमधील प्रमाण वाढले आहे.
ध्यानात्मक आसने, शरीरोपयोगी आसने, विश्रांतीकारक आसने आदी योगासनांच्या प्रकारांची इंटरनेटवर मुबलक माहिती उपलब्ध होते. पद्मासन, स्वस्तिकासन, वज्रासन, हलासन, भुजंगासन, चक्रासन, वक्रासन, पर्वतासन, सर्वांगासन, मयुरासन, त्रिकोणासन, कटीचक्रासन, ताडासन, अर्धचंद्रासन, उष्ट्रासन अशी विविध आसने कशी करावीत, हालचाल कशी असावी, त्यामागील शास्त्र, कोणती आसने कोणी करु नयेत, अशी विविधांगी माहिती व्हिडिओंसह यूट्यूबवर सहज उपलब्ध आहे. आजकाल घरोघरी वायफायची सुविधा असल्याने घरच्या संगणकावर अथवा आपल्या स्मार्टफोनवर स्त्रिया योगासनांची प्रात्यक्षिके पाहून तसे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.
योगाशी संबंधित विविध अॅप्लिकेशनही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये योगालय, योगाचे १० प्रकार, आॅल योगा, रामदेव योगा, प्राणायाम, योगमुद्रा अशा विविध अॅप्लिकेशन्सच्या सहाय्याने योगासनांची माहिती मिळत असल्याने हे अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केले जातात. सोशल मिडियावरही प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. अनेक योगशिक्षिका मैत्रिणींना टॅग करुन स्वत:चे योगासनांचे व्हिडिओ पोस्ट करतात आणि आपल्या मित्रपरिवाराला योगासनांसाठी प्रवृत्त करतात.
>इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या गोष्टींचा प्रचार, प्रसार करणे शक्य होते. मी योगाच्या चार परीक्षा दिल्या आहेत. घरी मी योगा क्लासेस घेते. माझ्या काही मैत्रिणी अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्यांना स्काईपच्या माध्यमातून मी योगासनांचे विविध प्रकार करून दाखवते. आम्ही योगासने, प्राणायामबद्दल आॅनलाइन संवादही साधतो. योगासनांमुळे शारीरिक फिटनेससह मानसिक शांतीही लाभते. - रेखा जोशी, योगशिक्षक