International Yoga Day 2018 : विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करायचा कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:40 AM2018-06-21T02:40:54+5:302018-06-21T02:40:54+5:30
सध्या विद्यार्थी आपली नाराजी आणि व्यथा व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतात.
मुंबई : सध्या विद्यार्थी आपली नाराजी आणि व्यथा व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील जीम, योग केंद्र, स्पोटर््स रुम बंद केल्याने आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाबा रामदेव तसेच श्री श्री रविशंकर यांना टॅग केले आहे.
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होत असल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर आता आयआयटीच्या वसतिगृहातील ही घटना समोर येत आहे. पवई येथील कॅम्पसमधील एका वसतिगृहातून जीम, योग केंद्र, स्पोर्टस रुम आणि इतर कार्यक्रमासाठी वापरले जाणारे विशेष केंद्र हद्दपार केल्याचे या ट्विटमधून समोर आले आहे. आज जागतिक योग दिन असून विद्यार्थ्यांकडून हक्काचे ठिकाणच हिरावून घेतले जाणार असेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिनाला कसा न्याय दिला जाणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.
वसतिगृहातील खोल्या वाढविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले असले, तरी त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. मुख्य म्हणजे, सध्या वसतिगृहाचे नुतनीकरण सुरु असून या नुतनीकरणाचा कामांचा फटका वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बसत असल्याची खंत ही या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आयआयटी मुंबईत सध्या अनेक विभागाच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्याबरोबरच कॅम्पसमधील अनेक वसतिगृहांचे नुतनीकरणाचे काम देखील हाती घेण्यात आले असून हॉस्टेल क्रमांक १४ मध्ये खोल्या वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करताना या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी असणारे योग केंद्र, जीम, कॉमन रुम, स्पोर्टस रुम तोडण्यात आली असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी नव्या खोल्या बांधण्यासाठी या केंद्राचा बळी दिला जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या संदर्भात आयआयटीचे संचालक देवांग खाकर यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच या प्रश्नी संचालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.