International Yoga Day 2018 : शाळा-महाविद्यालयांत योगाचे धडे, विद्यार्थ्यांसाठी योग धोरण तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:03 AM2018-06-21T02:03:53+5:302018-06-21T02:03:53+5:30
सध्या स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो ताण सहन करून पुढे जाणे अनेकांना जमत नाही.
- श्रीकिशन काळे
पुणे : सध्या स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो ताण सहन करून पुढे जाणे अनेकांना जमत नाही. परंतु योग ताणावर नियंत्रण आणू शकते. त्यामुळे मन आणि शरीर निरोगी राहते. म्हणूनच आता शाळांमध्ये योग हा विषय सक्तीचा केला जाणार आहे. त्यासाठीचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. तो मंगळवारी (दि.१९) उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शाळा-महाविद्यालयात योगाचे धडे गिरवताना विद्यार्थी दिसणार आहेत. आता अंमलबजावणी कशी करायची, याबाबत समितीला विचार करावा लागणार आहे.
योग ही आपली प्राचीन काळापासूनची एक निरोगी राहण्याची जीवनशैली आहे. आज शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ही जीवनशैली उपयुक्त आहे. हीच जीवनशैली आता शाळा-महाविद्यालयात शिकवली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक योग धोरण समिती स्थापन केली आहे. धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी उपसमिती नियुक्त केली होती. त्यामध्ये राज्यातील योग संस्थांतील प्रमुख व्यक्तींचा सहभाग आहे.
पुण्यातील योगतज्ज्ञ डॉ. पल्लवी कव्हाणे यांचा समितीमध्ये समावेश आहे. त्यांनी लोकमतशी बोलताना या विषयाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून योगाकडे लोकांचा कल वाढतो आहे. योगासनांच्या स्पर्धा असतात. त्यामुळे याकडे विद्यार्थ्यांचा ओढा होताच; पण आता मध्यमवर्गीय लोकांचादेखील कल वाढत आहे. कारण सध्या प्रत्येकाला काही तरी ताणतणाव आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक बनले आहे.
योगामुळे शरीर व मन यावर ताबा राहतो. बालभारतीतर्फे शारीरिक शिक्षण या विषयातंर्गत योगाची आसने घेतात. पण तो व्यायाम म्हणून घेतली जातात. तसेच ते शिकवणारे शिक्षक योगाचे शिक्षण घेतलेले नसतात. त्यामुळे हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. परंतु आता आम्ही शाळा आणि महाविद्यालयात शिकविण्यासाठी योग धोरण तयार केले आहे. ते शासनाकडे नुकतेच पाठविले आहे. केवळ आता त्याची अंमलबजावणी कशी करायची ते ठरविणे आवश्यक आहे. कारण मोठ्या प्रमाणावर योगशिक्षक उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे जे शारीरिक शिक्षणाचे धडे देतात, त्यांनाच योगाचा अभ्यासक्रम शिकवून तयार करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच योग संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेता येईल. शासनाने यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
>अभ्यासक्रमात लेखी
आणि प्रात्याक्षिक असणार
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही आसनांची माहिती आणि वयानुसार अभ्यासक्रम तयार केला आहे. यात लेखी आणि प्रात्याक्षिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पातंजल सूत्र आणि अधिक विस्तृत माहिती देणारा अभ्यासक्रम तयार केला आहे, असे पल्लवी कव्हाणे यांनी सांगितले. बालभारतीने तयार केलेल्या योगाच्या शिक्षणाचा आणि इतर साहित्याचा अभ्यास करून हे धोरण बनविल्याचेही त्यांनी सांगितले.
>योग धोरणाचा अंतिम मसुदा माझ्याकडे आला आहे. त्याबाबत समितीची
बैठक घेऊन तो शासनाकडे सादर करणार आहोत. तसेच गुरूवारी होणारा जागतिक योग दिन महाविद्यालयात साजरा करावा, याची सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आली आहे. - धनराज माने, उच्च शिक्षण संचालक व योग धोरण समिती सदस्य
>धोरण अंमलबजावणीसाठी सूचना
शारीरिक शिक्षकांना योगाचे शिक्षण देऊन त्यांना पारंगत करावे.
योग संस्थेत
शिक्षण घेतलेल्यांना शिकविण्यासाठी
नियुक्त करावे
महिन्यातून एकदा किंवा दोनदा योगतज्ज्ञांना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवावे
सध्या मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्येही तणाव वाढत आहे. त्यामुळे नैराश्य निर्माण होते आणि विचित्र निर्णय घेतले जातात. योगाने मन व शरीर चांगले राहते. त्यामुळे सध्या योगाकडे लोकांचा
कल वाढत आहे.
आज घराघरांत योग पोचला आहे. परंतु तो योग शिक्षकाकडूनच
शिकला पाहिजे.
- डॉ. पल्लवी कव्हाणे,
सदस्य, योग धोरण समिती,
महाराष्ट्र राज्य