International Yoga Day: ...अन् योगामुळे जुळून आला 21 कैद्यांच्या सुटकेचा योग; 6 महिन्यांची शिक्षा माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 03:48 AM2019-06-21T03:48:40+5:302019-06-21T07:05:21+5:30
विसापूर खुल्या कारागृहातील कैद्यांसाठी आनंदाची बातमी; पतंजली योग समितीला यश, वर्तनात सुधारणा
- भाऊसाहेब येवले
राहुरी (जि. अहमदनगर) : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे असलेल्या खुल्या कारागृहात गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे़ वर्तनात सुधारणा झाल्याने २१ जणांची सहा महिन्यांची शिक्षा कमी करण्यात आली आहे.
दोन वर्षांपासून योग शिक्षक मधुकर निकम यांनी बंदिवासीयांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला़ कारागृहात सहा दिवसांचे योग प्राणायम शिबिर घेतले होते़ त्यानंतर करागृहात बंदिवानांतूनच तीन योग शिक्षकही तयार करण्यात आले़ अनुप दीक्षित हे पतंजलीचे योग शिक्षक आठवड्यातून एकदा कारागृहात योगाचे धडे देत आहेत़ आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी कारागृहात योग प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बंदिवानांमधून माने व जगताप या दोघांनी १६३ कैद्यांना दोन वर्षांपासून योगाचे धडे दिले आहेत़ त्यामुळे बंदिवानांच्या मानसिकतेत बदल झाला. वागणुकीमध्ये झालेल्या बदलाची दखलही राज्य शासनाने घेतली आहे़ कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांचे सहकार्य लाभले आहे़ वेगवेगळ्या गुन्ह्यातील हे कैदी आहेत. दहापेक्षा जास्त वर्षे शिक्षा झालेल्या कैद्यांना योग केल्याने लाभ झाला आहे. विसापूर कारागृहाची दखल राज्य शासनाने घेऊन परिपत्रक काढले आहे़ राज्यातील कारागृहातील कैद्यांना योग, प्राणायमचे धडे देण्याची सूचना त्यात करण्यात आली आहे़ त्यासाठी शासनाने पतंजली योग समितीला विनंतीही केली आहे़
क्षणीक रागामुळे मनुष्याच्या हातून वाईट कृत्य घडते़ त्यामुळे कारागृहात खितपत पडल्यामुळे कुटुंबाची वाताहत होते़ योग प्राणायमामुळे कैद्यांचे आरोग्य उंचावण्यास मदत होते़ त्यातून परिवर्तन होऊन त्याचे वर्तन सुधारते़ त्यामुळे राज्यातील सर्व कारागृहात योग प्राणायमचे नियमित वर्ग घेणे ही गरज आहे़
-मधुकर निकम, जिल्हा संघटक, पतंजली योग समिती