असा सुरू झाला आंतरराष्ट्रीय योग दिन !
By Admin | Published: June 21, 2017 08:28 AM2017-06-21T08:28:47+5:302017-06-21T09:18:41+5:30
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21- निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. शरीरामध्ये तसंच आपल्या विचारांमध्ये पॉसिटीव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी योगा करा असा सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो. इतकचं नाही, तर योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राजकीय नेते तसंच सेलिब्रेटीही पुढाकार घेतात. योगाचा हा प्रचार आणि प्रसार सध्या चालू आहे. पण विशेष म्हणजे जगभरात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचं संपूर्ण श्रेय हे भारताला जातं. भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते, असं जाणकार सांगतात. योगाची हीच प्राचीन परंपरा जपायला हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊलं उचलली होती.
नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेचच तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली होती. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम कसे असताता या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
"भारताला योगाची प्राचीन परंपरेपासून अमुल्य भेट मिळाली आहे. माणसाचं मन, शरीर, विचार,कृती तसंच संयम या सगळ्यामध्ये एकाग्रता आणण्याचं काम योगा करतं. आरोग्य आणि कल्याणाकरिताचा वेगळा दृष्टीकोन योगातून मिळतो", अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मांडताना व्यक्त केली होती. आपली जीवनशैली बदलायला आणि चैतन्य निर्माण करायला योगा चांगल्याप्रकारे मदत करू शकतो म्हणूनच आम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी काम करू द्या, असंही मोदी सभेत म्हणाले होते.
संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलांमध्ये ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या या महासभेत 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधी होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी उपस्थित होते. संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.
- म्हणून 21 जून हा दिवस ठरला आंतरराष्ट्रीय योग दिन.
संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला.