इंटरनेट जोडणीचा हार्बरला फटका
By admin | Published: June 13, 2016 05:23 AM2016-06-13T05:23:50+5:302016-06-13T05:23:50+5:30
: हार्बर मार्गावरील वडाळ््याजवळील रावळी जंक्शन सध्या रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे.
मुंबई : हार्बर मार्गावरील वडाळ््याजवळील रावळी जंक्शन सध्या रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. रेल्वेच्या खांबावर चढून ट्रॅकजवळील बाजूच्या वस्तीत इंटरनेट जोडणी करीत असताना ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने एक जण जखमी झाला आणि त्यामुळे रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन हार्बर रेल्वेसेवा संध्याकाळच्या सुमारास कोलडमली. त्यामुळे रविवारी हार्बरवासीयांचे हाल झाले.
हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. सकाळी ११.१0 वाजता घेण्यात आलेला ब्लॉक दुपारी पावणे चारपर्यंत सुरू होता. ब्लॉक संपताच लोकल सुरू होऊन हार्बरवासीयांना दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र ब्लॉक संपल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास रावळी जंक्शन येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि हार्बर सेवा कोलडमली. वडाळा रोड स्थानकाजवळील रावळी जंक्शन येथील ट्रॅकजवळ मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये इंटरनेटची जोडणी देण्यासाठी दोन जण काम करीत होते. दोघेही ट्रॅकजवळील रेल्वे खांबांवर चढले. यातील एक जण इंटरनेटची वायर टाकत असताना वायरचा रेल्वे खांबाच्या बाजूनेच जाणाऱ्या ओव्हरहेड वायरशी संपर्क आला आणि त्यामुळे बाजूलाच असणाऱ्या रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. स्फोटामुळे जवळपास १५ फ्युज जळाले. यात संपर्कात आलेली व्यक्ती तर खांबावरून फेकली गेली. त्याला सहकाऱ्याने त्याला त्वरीत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)