आंतरजातीय लग्न केल्यानं जोडप्याला जीवे मारण्याची धमकी; महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 02:41 PM2022-01-12T14:41:47+5:302022-01-12T14:42:30+5:30
आंतरजातीय विवाह करणारे दोघेही पदवीधर आहेत. तरुण तर ग्रामपंचायत सदस्यही आहे. दोघांनी परस्पर संमतीनं विवाह केला असला तरी अनेकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला आहे
प्रशांत भदाणे
जळगाव – सिनेमात दाखवण्यात येणारं चित्र हे नेहमी काल्पनिकच नसतं तर काही घटना खऱ्या आयुष्याशी निगडीत असतात. सैराट सिनेमा तुम्ही पाहिला असेल. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात घडत असेल तर ते दुर्दैवीच म्हणावे लागेल. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बाभळेनाग गावात ही घटना घडली आहे. एका तरुण-तरुणीनं आंतरजातीय विवाह केल्यानं गावातील लोकांकडून त्यांचा छळ सुरु असून या दोघांनी गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या कुटुंबीयांनाही अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही जिल्हा पोलीस प्रशासनानं या घटनेची दखल घेतलेली नाही त्यामुळे राज्यात कायद्याचं राज्य आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
बाभळेनाग गावातील एका तरुण-तरुणीनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरजातीय विवाह केला. हे दोघे ४ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. विवाह केल्यानंतर दोघांना तरुणीच्या घरच्यांकडून विरोध व्हायला लागला. गावातील इतर लोकही त्यांचा छळ करू लागले. तरुणाच्या कुटुंबानं हा विवाह मोडून गाव सोडून जावं म्हणून सर्वच स्तरातून दबाव टाकला जाऊ लागला. छळ असह्य झाल्यानं दोघांनी पारोळा पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. शेवटी तरुणानं राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडं आपली कैफियत मांडली आहे.
आंतरजातीय विवाह करणारे दोघेही पदवीधर आहेत. तरुण तर ग्रामपंचायत सदस्यही आहे. दोघांनी परस्पर संमतीनं विवाह केला असला तरी अनेकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी आर्जव जोडपे करत आहेत. दरम्यान, या घटनेतील पीडित जोडप्यानं पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांची भेट घेत तक्रार केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई पण केली आहे. पीडित जोडप्याला संरक्षण देण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेंनी दिली. मात्र आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून समाजातून होणारा विरोध महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना शोभणारा आहे का? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे.