आर्थिक गुन्हे शाखेकडून अनिल देसाई यांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:19 PM2024-03-06T13:19:10+5:302024-03-06T13:19:37+5:30
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केली.
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केली. शिवसेना पक्षाच्या खात्यातून ५० कोटींहून अधिकची रक्कम काढण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने देसाई यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर त्यांच्या पक्षाकडून माजी आ. किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी ३० जानेवारीला मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे टीडीएस लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने याची प्राथमिक चौकशी सुरू करत अनिल देसाई यांना ५ मार्चला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, देसाई हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सात तास कसून चौकशी केली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.
आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करत आहोत -देसाई
nआमच्या पक्षाबद्दल तक्रार होती. त्याच्या प्राथमिक चौकशीसाठी बोलावले होते. उपलब्ध माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे.
nप्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे पद असते. आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करत आहोत, असे देसाई यांनी
सांगितले.