पुनर्मूल्यांकनास शाळांकडून अडथळा
By admin | Published: June 10, 2016 01:08 AM2016-06-10T01:08:25+5:302016-06-10T01:08:25+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव शाळांच्या मार्फत विभागीय मंडळाकडे पाठविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संबंधित शाळेच्या वर्गशिक्षकांना छायांकित प्रत दाखविणे आवश्यक आहे. मात्र, शाळांकडून विद्यार्थी व पालकांना सहकार्य केले जात नसल्याचे समोर आले आहेत.
राज्यमंडळाने दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती देण्यास तसेच पुनर्मूल्यांकन्याचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरूवात केले आहे. राज्य मंडळाने त्यासाठी वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे ठराविक कालावधीमध्येच छायांकित प्रत घेवून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतून यासंदर्भातील प्रस्ताव पाठविणे बंधनकारक आहे. परंतु, काही शाळांकडून पालकांना व विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच उभे केले जाते. उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एका पालकाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे प्रस्ताव शाळेमार्फत मंडळाकडे पाठवावे लागतात. परंतु, काही शाळांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा चुकीची वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. एका पालकाने दस्तूर शाळेबाबत लेखी तक्रार दिली आहे. मंडळाकडे पुनर्मूल्यांकनाचे प्रस्ताव योग्य वेळेत गेले नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. कोणत्याही शाळेबाबत विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.