मुलाखत- लढण्याची ताकद असेल तरच मी टू म्हणा..! तेजस्विनी पंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 10:16 PM2018-10-11T22:16:31+5:302018-10-11T22:35:31+5:30
मी टू चळवळीतून पुरुष लक्ष्य तर केले जात नाही ना.. ही चळवळ म्हणजे पब्लिसिटी स्टंट असू शकतो कां..? असे विविध प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात संशय कल्लोळ उठवत आहे. याच मी टू चळवळीवर लोकमतच्या नम्रता फडणीस यांनी प्रसिध्द अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्याशी साधलेला संवाद...
* मी टू चळवळीकडे तू कोणत्या दृष्टीकोनातून पाहतेस?
- मी टू’ चळवळीच्या माध्यमातून महिला पुढे येत आहेत. आपल्यावरील लैंगिक अत्याचार किंवा शोषणाविरूद्ध बोलत आहेत ही चांगली बाब आहे. मात्र, आपल्यावर झालेल्या अन्यायाला शेवटपर्यंत न्याय देण्याची, त्या पुरूषाला शिक्षा होईपर्यंत लढा देण्याची ताकद असेल तरच ‘हॅश टॅग मी टू’ चळवळीत सहभागी व्हा. नुसते सोशल मीडियावर ’मी टू’ च्या माध्यमातून आपले अनुभव शेअर करणार असाल तर काहीही उपयोग नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक लढा आहे, तो ‘ती’ ने स्वत:च सक्षमपणे लढला पाहिजे.
* ही चळवळ महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे, असे वाटते का?
- सगळेच पुरूष वाईट असतीलच असे नाही. काही पुरूष निर्दोष देखील असतील. जे पुरूष महिलांचे लैंगिक शोषण किंवा अत्याचार करत असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे किंवा त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई झालीच पाहिजे यात दुमत नाहीच.आता ‘मी टू’ चळवळ सुरू झाली आहे. ज्यांना बोलावसं वाटतं त्यांनी बोलावं पण त्यातून निष्पन्न काय होणार आहे? तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे का? की हे प्रकरण शेवटपर्यंत धसास लावायचे. मला लाईक किंवा कुणाकडून दयेची अपेक्षा नाहीये. जेव्हा एखाद्या महिलेवर अन्याय होतो. तेव्हा त्याचे काही टप्पे असतात. या चळवळीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
* हॉलिवूड, बॉलिवूडसह अनेक अभिनेत्री आपले अनुभव मांडत असताना मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री गप्प का ?
- कलाकार विशिष्ट विषयांवर भूमिका घेताना दिसत नाही अशी कायम ओरड केली जाते. पण आम्हाला मीडियाने प्रश्न विचारला तर आम्ही आमची मते व्यक्त करणार ना?आपल्याकडे आजकाल काय झालय की खूप गोष्टी ‘फॅशन’ नुसार चालतात. दीपिका पदुकोण ने पण नैराश्यासाठी ‘हॅश टॅग’ सुरू केले आहे.आजमितीला केवळ अभिनेत्रीच नव्हे तर सामान्य महिलांनाही या गोष्टीला सामोरे जावे लागते. समाजात शंभर टक्क्यापैकी 95 टक्के महिला असतील ज्यांना असे अनुभव येतातच. प्रत्येक जणी ‘मी टू’ मधून गेल्याही असतील. आपल्या पातळीवर जमेल तसं त्या गोष्टींशी त्या लढत आहेत. काही जणी बोलतात किंवा काहीजणी गप्प बसतात. माझ्याबाबतीतही असं खूपदा घडलंय किंवा घडून गेलंय.. पण मला कधी जगाला हे सांगावेसे वाटलं नाही कारण मला माझ्यासाठी मी पुरेशी वाटते. मला लोकांना सांगायचं आहे की नाही? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.
* तुला वैयक्तिक अनुभव आला आहे का? त्याविरूद्ध तू कसा लढा दिलास?
माझ्यावर जेव्हा असा प्रसंग कधी आला तेव्हा मी माझ्या पातळीवर त्या पुरूषांना उत्तर दिले. त्या माणसांना त्याची जागा दाखवणे एवढीच माझी अपेक्षा होती. त्यामुळे आज मराठी चित्रपटसृष्टीमधली एकही व्यक्ती माझ्याशी वाईट वागायचे धाडस करणार नाही. इतका मी स्वत:चा एक दरारा निर्माण केला आहे.
* या चळवळीचे भविष्य काय असे वाटते? महिलांनी काय करणे अपेक्षित आहे?
- न्यायाची अपेक्षा असेल तर त्याच्याविरूद्ध इतक्या वर्षांनी तक्रार दाखल करणार का? त्याला शिक्षा मिळेपर्यंत लढा देणार का? हे प्रश्न पण स्वत:ला विचारले गेले पाहिजेत. काही जणींच्या बाबतीत खरचं गंभीरपणे दखल घ्याव्यात अशा गोष्टी घडल्या आहेत. त्या ताकदीने पुढे येऊन बोलत आहेत या त्यांच्या धाडसाचे खरचं कौतुक आहेच. पण नुसतं कौतुक करून उपयोग नाही तर याचा पाठपुरावा करून खरंच शेवटपर्यंत लढा देणार आहात का? आता ‘फॅशन’ मध्ये हॅश टॅग मी टू आहे म्हणून हे सीमित आहे. आपल्यापेक्षा आपल्याला कुणीच ओळ्खत नसते, हे सर्व करून तुम्ही काय मिळवणार आहात. आपल्याला नक्की काय साध्य कारयचं आहे? इतकं स्वत:ला ओळ्खलं पाहिजे. महिलांनी स्वत: निर्णय घ्यायचाय. त्यांना जगासमोर या गोष्टी आणाव्या वाटत असतील तर त्यांनी जरूर त्या आणाव्यात. पण केवळ त्या जगासमोर आणून उपयोग नाही, कारण तुमच्याशी कुणीही लढणार नाही. लोकांना काही घेणे देणे नाही. ते फक्त लाईक, लव्ह चे सिम्बॉल टाकतील किंवा दुःखद स्माईली पाठवतील किंवा कमेंटस मध्ये महिलांचा पाठिंबा मिळेल, पुरूष कसे वाईट, याचे पाढे वाचले जातील पण ते तुमच्या बाजूने लढायला उतरणार नाहीत. एकदा आवाज उठविल्यानंतर सगळ्या गोष्टींचा नंतर महिलांनाच सामना करावा लागणार आहे.
* सारासार विचार करुन पावले टाका?
- त्यामुळे या सर्वांचा विचार करून मगच पावले उचला, असे महिलांना सांगू इच्छिते. नुसतं बोलून सोशल मीडियावर हे शेअर करून फक्त सहानुभूती मिळवायची आहे की त्यातून न्याय पण हवा आहे याचाही शांतपणे विचार केला पाहिजे.