धाकधूक , उत्सुकता अन् आनंदही!
By admin | Published: February 19, 2016 01:51 AM2016-02-19T01:51:55+5:302016-02-19T01:51:55+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी उत्साही वातावरणात परीक्षेला सामोरे गेले. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. परंतु, पेपर सोपा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला.
शहरातील भावे हायस्कूलसह विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावर्षी अभिनव कला भारतीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींना रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सहसचिव अनिल गुंजाळ व शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे आदी उपस्थित होते. या वेळी म्हमाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रसन्न वातावरणात परीक्षा द्यावी. त्याच प्रमाणे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे. शहरातील काही संस्था-संघटनांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी मराठा हायस्कूलने विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. पहिला दिवस असल्याने काही पालक मुलांना परीक्षा केंद्रावर सोडविण्यास आले होते. तर काही विद्यार्थी दुचाकीवरून आले होते. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मित्रांशी गप्पा मारून पुढील पेपरच्या तयारीबाबत चर्चा केली तर काहींनी पुढील पेपरच्या अभ्यासासाठी घर गाठले. नवी पेठ येथील सौरभ गालिंदे म्हणाला, पेपरचा सर्व अभ्यास झालेला असल्यामुळे पेपर सोपा गेला. रस्ते खोदून ठेवलेले असल्याने वाहतूककोंडी झाली होती.
शंतनू त्रिभुवन म्हणाला, पेपर चांगला होता. जवळचे परीक्षा केंद्र मिळाल्याने केंद्रावर पोहचण्यास अडचण आली नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले.
औरंगाबाद विभागात सर्वाधिक १७ विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याची माहिती राज्य मंडळातर्फे सांगण्यात आली. औरंगाबाद विभागापाठोपाठ नाशिक विभागात १३, पुणे विभागात ५, नागपूरमध्ये ५, मुंबई विभागात १, अमरावतीमध्ये ५ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले.