धाकधूक, भीती अन् पेपर पडला हातात!
By admin | Published: March 1, 2017 12:41 AM2017-03-01T00:41:41+5:302017-03-01T00:41:41+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेची मंगळवार (दि. २८) पासून सुरुवात झाली.
पिंपरी : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेची मंगळवार (दि. २८) पासून सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरात १७ परीक्षा केंद्रावर अंदाजे २१ हजार ६२ विद्यार्थी परीक्षेला बसले. बोर्ड परीक्षेच्या सुरुवातीस असणारा इंग्रजी विषयाचा पेपर शांततामय वातावरणात पार पडला.
बारावीची बोर्ड परीक्षेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे अभ्यासाचे वातावरण आहे. मंगळवारी (दि. २८) इंग्रजी विषयाच्या पेपरने बारावी बोर्ड परीक्षेस सुरुवात झाली. वर्षभर केलेल्या अभ्यासाची कसोटी या परीक्षेला लागणार असल्याने साहजिकच पालक व विद्यार्थ्यांना वाटणारी चिंता त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. ऐन परीक्षेवेळी कोणतीही गडबड होऊ नये. यासाठी जागरूक पालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशीच परीक्षा केंद्र व बैठक क्रमांकाची माहिती घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना वेळेत व कोणत्याही अडचणीशिवाय केंद्रावर पोहोचण्ो शक्य झाले.
बहुतांश केंद्रांवर नियोजित वेळेआधीच विद्यार्थी उपस्थित होते. यातील काही मुले एकट्याने तर काही गटाने अभ्यास (वाचन) करताना दिसली. तर काही गटांमध्ये विषयांबाबत चर्चा करताना दिसून आले. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, तसेच परीक्षा केंद्रावरील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी केंद्रांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. यासाठी परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था लिहिलेले फलक लावण्यात आले. केंद्रसंचालकांकडून विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. तर, काही केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधण्यात आला.
उन्हाळ्याचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी वर्गाबाहेर पाण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी केंद्राने घेतल्याचे दिसून आले. मुख्य केंद्राचे प्रमुख एस.व्ही. देशपांडे म्हणाले, की बारावीची परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. तसेच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये अभ्यासाचे जादा तास घेत उजळणी घेण्यात आली असून, तणावमुक्त वातावरणात पेपर सोडविले जावेत, याकरिता विद्यार्थी व पालक यांना समुपदेशन करण्यात आले आहे. लोणावळा महाविद्यालयाचे संजय साळुंखे व डॉन बॉस्को हायस्कूलचे प्राचार्य क्रेसेन्स लेमोस हे केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. कोणतीही गडबड व गोंधळ न करता विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेल्याचे दिसून आले. या व्यतिरिक्त शहरात बारावीचा पेपर फुटल्याची चर्चा होत होती. परंतु पिंपरी-चिंचवड परिसरात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तरी पालकांनी व विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले.
(प्रतिनिधी)
>लोणावळा : १३६६ मुलांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी लोणावळा केंद्रावर १३६६ विद्यार्थी बसले आहेत. व्हीपीएस हायस्कूल हे बारावीचे मुख्य केंद्र असून, लोणावळा महाविद्यालय व डॉन बॉस्को हायस्कूल ही दोन उपकेंद्रे आहेत. या तीन केंद्रांवर कला विभागाचे ३०० विद्यार्थी, वाणिज्य विभागाचे ८०१ विद्यार्थी व सायन्सचे २६५ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. आज इंग्रजी या विषयाचा पेपर शांततेमध्ये पार पडला.