‘त्या’ बनावट नोटांची घुसखोरी बांगलादेशातून
By admin | Published: August 5, 2014 12:59 AM2014-08-05T00:59:24+5:302014-08-05T00:59:24+5:30
बनावट नोटांच्या प्रकरणात वर्धा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याला या नोटांचा पुरवठा बांगला
पश्चिम बंगालमधून नोटा विकणाऱ्याला अटक : टोळीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांपुढे आव्हान
वर्धा : बनावट नोटांच्या प्रकरणात वर्धा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याला या नोटांचा पुरवठा बांगला देशातून होत असल्याची धक्कादायक बाब तपासात पुढे आली आहे.
बांगला देशात नोटांची छपाई करुन त्या भारतात पेरण्याचे काम मोठ्या टोळीच्या माध्यमातून होत असावे, असा पोलिसांना संशय आहे. मात्र या टोळीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अधिक माहितीसाठी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केलेल्या आरोपीला वर्धा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अब्दुल खालिक आबेद अली रा. सुलतान गंज, कालिया चौकी, माकद पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
२४ जुलै रोजी नागपूर एटीएस पथकाने वर्धा पोलिसांच्या सहकार्याने येथील रेल्वे स्थानक परिसरातील एका भोजनालयातून बॅगमध्ये दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेवून अमरावतीला जाण्याच्या बेतात असलेल्या शेख आसिफ शेख उस्मान (२२) रा. पुसद याला अटक केली. यानंतर मोहसीन खान वल्द मलान खान (२७) रा. हजरत उमल फारुख रा. पुसद व मोहम्मद इकबाल वल्द नूर हसन (४०) रा. गवळीपुरा मशिदपुरा अमरावती या दोघांना अटक करण्यात आली. या तिघांचीही कसून चौकशी केली असता पश्चिम बंगालमधून अब्दुल खालिक आबेद अली याच्याकडून ४५ हजारात एक लाख बनावट नोटा याप्रमाणे खरेदी केल्याची कबुली दिली होती.
याआधारे वर्धा पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. मात्र त्याचा शोध पोलिसांना लागला नाही. पथकाने माघार न घेताच गावात सापळा रचून ठेवला. तो गावात आल्याची माहिती मिळताच रविवारी हे पथक तेथे पोहोचले. अखेर नोटा विकणाऱ्या अब्दुल खालिक आबेद अली याला मोठ्या शिताफीने अटक केली. झडती घेतली असता त्याच्याकडून पुन्हा दोन लाखांच्या नोटा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी दुपारी ४ वाजता पोलीस पथक आरोपीला घेऊन वर्धेत दाखल झाले.
या नोटा त्याच्यापर्यंत बांगला देशातून पोहोचल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. या कामात आंतराष्ट्रीय टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला या बनावट नोटा कोण पोहोचवितो. तो केव्हापासून नोटांची विक्री करीत आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान वर्धा पोलिसांपुढे असून त्या दिशेने तपास सुरू आहे. ही कारवाई ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)