असहिष्णुतेची चर्चा सुनियोजित !
By admin | Published: January 14, 2016 04:22 AM2016-01-14T04:22:43+5:302016-01-14T04:22:43+5:30
देशाच्या काही भागाचा अजून कसलाही विकास झालेला नाही. आजही तेथील लोकांना मूलभूत गरजांसाठी मैलोन्मैल चालावे लागते. असे असूनही हे लोक कधी देश सोडण्याचा विचार करीत नाहीत.
सुखवस्तूंना टोला : केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू यांचे मत
- चक्रधर दळवी, औरंगाबाद.
देशाच्या काही भागाचा अजून कसलाही विकास झालेला नाही. आजही तेथील लोकांना मूलभूत गरजांसाठी मैलोन्मैल चालावे लागते. असे असूनही हे लोक कधी देश सोडण्याचा विचार करीत नाहीत. पण देशाने सर्व सोयीसुविधा व मानमरातब पुरविलेला सुपरस्टार मात्र देश सोडून जाण्याचा विचार करतो व असहिष्णुतेची चर्चा करतो. ही चर्चाच मुळी सुनियोजित रीतीने केली जात आहे, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी येथे केली.
राज्यमंत्री रिजिजू ‘कलासागर’च्या कार्यक्रमासाठी बुधवारी औरंगाबादेत आले. त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन संपादक मंडळासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, ‘कलासागर’चे अध्यक्ष अनिल भंडारी, ‘लोकमत’चे संपादकीय संचालक व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा व संपादकीय वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. रिजिजू यांनी यावेळी ‘लोकमत’ टीमशी संवाद साधला, त्याचा हा संपादित अंश...
प्रश्न : आपले ‘लोकमत’ परिवारातर्फे हार्दिक स्वागत आहे. आपली ही पहिलीच औरंगाबाद भेट असून, इथे आल्यावर आपली काय भावना झाली ?
औरंगाबादला भेट द्यावी, ही माझी खूप दिवसांची इच्छा होती. हे दोन कारणांसाठी होते, एक म्हणजे जगप्रसिद्ध ठेवा असलेली अजिंठा-वेरूळ लेणी पाहायची होती. दुसरे म्हणजे हे शहर मराठवाड्याची राजधानी असल्यामुळे इथे येऊन लोकांच्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्याची आतुरता होती. तशी संधी मिळताच मी लगेच आलो. ‘कलासागर’ने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चांगला कार्यक्रम आयोजित केला. ख्यातनाम गायिका आशा भोसले या कार्यक्रमाला येणार आहेत. या कार्यक्रमाला येण्याचे मी ठरवले.
प्रश्न : आपला हा दौरा औरंगाबाद विभागासाठी लाभदायक ठरो अशी आशा व्यक्त करीत पुढचा मुद्दा म्हणजे आपण केंद्र सरकारात गृहराज्यमंत्री या महत्त्वाच्या पदावर आहात. तुमच्या पदाची व्याप्तीही मोठी आहे. अंतर्गत सुरक्षेपासून ते दहा सुरक्षा दलांचा कारभार तुमच्या मंत्रालयांतर्गत येतो. यातील कोणती बाब आव्हानात्मक वाटते?
- हे पाहा, जेव्हा आपण गृहमंत्रालयाची चर्चा करतो, तेव्हा लोक प्रथम सुरक्षेचाच विचार करतात. सुरक्षितता नाही तर काहीच नाही. शहरात शांतताच नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आपण आज ‘स्मार्ट सिटी’च्या गोष्टी करतो; पण शहर सुरक्षित नसेल तर त्या ‘स्मार्टनेस’ला काही अर्थ नाही. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा हे मला आव्हान वाटते. दुसरे म्हणजे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ अर्थात आपत्ती व्यवस्थापन हा विषय मी दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आहे.
बऱ्याच जणांना कल्पना नसेल, संयुक्त राष्ट्रांचा ‘युनायटेड नेशन्स डिझास्टर चॅम्पियन’ हा पुरस्कार मिळवणारी भारतातील मी पहिली राजकीय व्यक्ती आहे. हा पुरस्कार २००५ पासून दिला जातो. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी मला तो मिळाला. याची फार प्रसिद्धी मी केली नाही, कारण सरकारात असल्यामुळे हे माझे कामच आहे, असे मी मानतो. आपत्ती व्यवस्थापनाला आमचे सरकार खूप महत्त्व देते. त्यानंतर सीमा व्यवस्थापनाला मी खूप महत्त्व दिले.त्यानंतर सीमा व्यवस्थापनाला मी खूप महत्त्व दिले. हे सर्व विषय आम्ही अतिशय काळजीपूर्वक हाताळतो. गृहमंत्रालयाकडे बरेच काम असते. पण काही विषयांना आम्ही प्राधान्याने हाताळले.
पठाणकोट चौकशी योग्य दिशेने
प्रश्न : पठाणकोटमध्ये अलिकडे जो प्रकार घडला ती सुरक्षा व्यवस्थेतील चूक होती की गुप्तचर यंत्रणेतील तो दोष होता? यात नेमकी चूक कोणाची झाली?
- या प्रकाराची चौकशी सुरू असल्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही. ‘एनएआय’ ची चौकशी सुरू असून त्यात चांगली प्रगती झाली आहे. काही चुकीचे जरूर घडले आहे. परंतु गुप्तचर यंत्रणांनी चोख कामगिरी बजावली, त्यात काही चूक घडली नाही. दहशतवाद्यांचा हेतू आम्ही सफल होवू दिला नाही. आपण काही जीव गमावले हे मान्य करावेच लागेल, हे दुर्देवी घडले. पण दहशतवाद्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होवू दिले नाहीत.
प्रश्न : पण पठाणकोटला तर ‘एनएसजी’ची टीम तर आधीच पोचली होती. तरीसुध्दा पुढचे सर्व घडले. दहशतवादी आत घुसले, याचे काय कारण आहे?
- याची निश्चित चौकशी होईल. दहशतवादी इतक्या आत कसे काय घुसू शकले? याची चौकशी सुरू आहे. त्यांना कोणी मदत केली? कोठेतरी चुक निश्चित घडली आहे. त्याची चौकशी करणे हे आपले काम आहे. यात अधिक तपशील जाहीर करणे योग्य नाही. पण मी एवढे सांगू शकतो की, तपास योग्य दिशेने सुरू आहे.
प्रश्न : पंजाबात हे वारंवार घडते आहे. ही तिसरी घटना आहे. केंद्र - राज्य संबंधातील काही त्रूटी याला कारण आहेत का?
- पंजाबात संयुक्त सरकार असले तरी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोठेही तडजोड केली जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोणातूनच आम्ही त्याकडे पाहतो. सुरक्षेतील फटी शोधून त्यावर उपाययोजना केली जात आहे. उत्तर पंजाबातून घुसखोरी होते. तो प्रदेश अधिक सुरक्षित होण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
अलिकडील दंगलीबद्दल काय?
हे पाहा, मी गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली, पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर अशा दंगली वाढल्या आहेत, असे नाही. एखाद्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यास केंद्र सरकारला जबाबदार धरले जाते. माध्यमांमधूनही कधी कधी अतिरेक होतो. दादरीची चर्चा अधिक झाली, मालदाची झाली नाही. देशात असहिष्णुतेची चर्चा निर्माण केली आहे. हे कमी व्हावे असे आम्हाला वाटते; पण ही चर्चा सुनियोजित रीतीने केली जात आहे. आजही देशात असे भाग आहेत, जिथे कसलाही विकास झालेला नाही, ते लोक काही देश सोडून जात नाहीत. आजही अरुणाचल प्रदेशातील काही भागात मीठ आणण्यासाठी चार-पाच दिवस चालत जावे लागते. त्यांनी कधी देश सोडण्याचा विचार केला नाही; पण या देशातील सुपरस्टार, ज्याला सर्व सेवासुविधा मिळाल्या तो देश सोडून जाण्याचा विचार करतो आहे.