असहिष्णू पुणेकर! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणासोबत काढले सेल्फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:04 PM2017-07-21T15:04:33+5:302017-07-21T15:15:03+5:30
अपघातानंतर केवळ वेळेत मदत मिळाली नाही म्हणून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यामध्ये घडली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - अपघातानंतर केवळ वेळेत मदत मिळाली नाही म्हणून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यामध्ये घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरूणाकडे पुणेकरांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. इतकंच नाही तर त्याच्याबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ काढणारेही काही जण होते, पण त्याला मदत करायला कोणी धजावत नव्हतं. बघे त्याची मदत करण्याऐवजी फोटो काढून सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्यातच गुंग झाले होते.
ही घटना बुधवारी (दि. 19) भोसरीतील इंद्रायणीनगर कॉर्नर, येथे घडली. पुण्याच्या मोशीमध्ये राहणा-या 25 वर्षाचा सतीश प्रभाकर मेटे याचा या अपघातात मृत्यू झाला. सतीश हा चहा घेण्यासाठी आला होता, चहा घेऊन परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सतीष औरंगाबादचा होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा अपघात झाला. यावेळी वाहन चालकाने तेथून पळ काढला. या घटनेबाबत एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आला आहे. भोसरीमध्ये राहणारे दंतचिकित्सक कार्तिकराज यांनी या घटनेची माहिती दिली.
कार्तिकने दिलेल्या माहितीनुसार, ""मी बुधवारी सकाळी 6.30 वाजता माझ्या दवाखान्यात जायला निघालो होतो. तेवढ्यात इंद्रायनीनगरच्या कोप-यावर मला गर्दी दिसली. जखमी अवस्थेत कोणीतरी रस्त्यात पडलंय हे मला दिसलं. तो रक्ताच्या थारोळ्यात होता पण शुद्धीवर होता. त्याचा चेहरा कपड्याने झाकला होता पण तो हात-पाय हलवत होता. लोकांनी त्याला गराडा घातला होता. काहीजण त्याच्यासोबत सेल्फी घेत होते तर काही जण व्हिडीओही घेत होते. पण कोणी त्याची मदत करण्यासाठी धजावत नव्हतं. अखेर मी एक रिक्षा थांबवली, त्या रिक्षात प्रवासी बसले होते पण रिक्षाचालकाने पुढाकार घेतला. त्याने प्रवाशांना उतरण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही सतीषला रिक्षात बसवलं आणि रूग्णालयात पोहोचलो पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता"".