शेतकऱ्यांसाठी सुलभ विमा योजना सुरू कराव्यात - राज्यपाल
By admin | Published: September 18, 2016 04:17 AM2016-09-18T04:17:36+5:302016-09-18T04:17:36+5:30
शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात, सुलभपणे उपलब्ध होईल आणि प्रभावी असे विम्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व दुष्काळासारख्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी विमा कंपन्यांनी राज्य शासनाबरोबर सहकार्य करून शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात, सुलभपणे उपलब्ध होईल आणि प्रभावी असे विम्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.
असोचेमच्या वतीने वांद्रे येथे आयोजित ९ व्या जागतिक विमा परिषदेत राज्यपाल बोलत होते. राज्यपाल म्हणाले, समाजातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासन अनेक योजना राबवीत आहे. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना व
आरोग्य विमा यासारख्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक विमा योजना मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गासाठी कमी दराच्या हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विमा कंपन्यांनी शासनास सहकार्य करावे. (प्रतिनिधी)