मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची 'एसआयटी'मार्फत चौकशी करा- भाजपा
By admin | Published: March 8, 2017 06:07 PM2017-03-08T18:07:57+5:302017-03-08T18:07:57+5:30
रस्ते घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी करीत भाजपाने आज शिवसेनेवर पहिला हल्लाबोल केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - महापालिकेत झालेल्या रस्ते घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी करीत भाजपाने आज शिवसेनेवर पहिला हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या मागणीला विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत स्वपक्षीय सदस्यच आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मागणी फेटाळून लावली.
विधानसभेत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या कंत्राटाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. अनेक रस्त्यांची कामे बेकायदेशीररीत्या काढण्यात आली, या कंत्राटांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शशिकांत शिंदे, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी सांगितले. दरवर्षी मुंबई महापालिका 2400 कोटी रुपये रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी खर्च करत असते. 2016पर्यंतच्या अशा कामांच्या पालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ही चौकशी सुरू असतानाच घाईघाईत 2017मध्ये पुन्हा रस्त्यांच्या कामांचा हजारो कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले, स्थायी समितीतील सदस्यांनीच त्याला आक्षेप घेतल्याचे शेलार यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेत काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदारांना अन्य महापालिकांमध्ये कामे दिली जात आहेत. त्यामुळे अशा कंत्राटदारांबाबत सरकारने धोरण निश्चित करण्याची मागणीही केली. मुंबई महापालिकेत पारदर्शकता आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून, या संपूर्ण घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. त्यांच्या भूमिकेस काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.