सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली मालेगाव स्फोटाचा तपास करा
By admin | Published: May 17, 2016 03:09 AM2016-05-17T03:09:15+5:302016-05-17T03:09:15+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा फेरतपास होण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने संसदेत केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा फेरतपास होण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने संसदेत केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’च्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. दिवंगत हेमंत करकरे यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याने केलेला तपास चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मतही
त्यांनी मांडले. दुष्काळग्रस्तांना राज्य शासनाची मदत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य शासन दुष्काळ निवारण उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नाशिक, पुणे, मुंबईसारख्या शहरांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना २० दिवसांनंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. केंद्रात आघाडीचे सरकार असताना ते दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी होते. ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आताच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नगरचे माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या निधनानंतर घुले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार सोमवारी नगरला आले होते. (प्रतिनिधी)
>तपासातील निष्कर्ष जाहीर करा : प्रकाश
मुंबई : तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती.मनमोहन सिंग यांनी तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवाणींच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबी अवगत केल्या होत्या. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे अडवाणी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत. आज करकरेंच्या तपासावर आक्षेप घेतले जात असताना अडवाणींनी मौन न बाळगता त्यावेळी त्यांच्यासमोर कोणते तथ्य आले होते, ते जाहीर करावे, अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक भागवत यांच्या जीवालाही धोका असल्याचेही करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सरसंघचालकांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवतांनी त्यांची करकरेंशी भेट झाली होती की नाही, ते जाहीर केले पाहिजे अशीही मागणी मोहन प्रकाश यांनी केली.