माझ्या संपत्तीची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा! आमदाराची थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:33 PM2022-05-22T17:33:12+5:302022-05-22T17:36:00+5:30
मीरा भाईंदरच्या शिवसेना समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्वतःची व कुटुंबाच्या संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणे मार्फत चौकशीची खुली मागणी केली आहे.
मीरारोड -
भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय सूडाच्या पेटलेल्या आगीत ठिकठिकाणी धाडी, अटकसत्र व स्थानिक तसेच केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असताना मीरा भाईंदरच्या शिवसेना समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्वतःची व कुटुंबाच्या संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणे मार्फत चौकशीची खुली मागणी केली आहे.
मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना पत्र पाठवून स्वतःची व कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकीकडे गेल्या काही वर्षात केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या मागे लागू नये म्हणून काही नेत्यांनी भाजपाचा पदर धरला आहे. भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या विरुद्ध आरोप करणारे भाजपातून उठणारे आवाज बंद झाल्याचे चित्र आहे.
त्यातच पूर्वी भाजपात असलेल्या आ. जैन यांनी स्थानिक मतभेदातून शिवसेनेची कास धरली. आता थेट केंद्रातील प्रमुखां कडे स्वतःच स्वतःच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करून केंद्र व भाजपाची अडचण केल्याचे मानले जाते.
आपले सासरे मिठालाल जैन हे भाईंदर गावचे सरपंच , ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच राजस्थान मधून खासदार म्हणून निवडून आले होते. पती भरत हे गेली अनेक वर्षे बांधकाम व्यवसायात प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. आपण सासऱ्यांच्या मार्गावर चालत राजकारण हे समाजसेवेसाठी करत असून जनतेला समर्पित आहे . सासऱ्यानी त्यावेळी काँग्रेस सोडली होती तेव्हा आयकर विभागाची धाड पडल्याची आठवण सांगत तेव्हा सुद्धा तपासात काही चुकीचे सापडले नव्हते असे त्या म्हणाल्या.
माझे कुटुंब बांधकाम व्यावसायिक असतानाही असे पत्र देत असून जर मी केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत दोषी आढळले तर मी राजकारण सोडेन व जी कारवाई होईल त्याला सामोरे जाऊ असे आ. जैन यांनी म्हटले आहे. तपासात काहीच आढळले नाही तर तसे केंद्रीय यंत्रणांनी जाहीर करून आम्हास प्रोत्साहित करावे आणि अश्या प्रकारची भूमिका अन्य लोकप्रतिनिधी बाबत सुध्दा घेण्यात यावी जेणे करून भ्रष्टाचार विरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल अशी अपेक्षा आ. जैन यांनी व्यक्त केली आहे.