पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:33 AM2019-10-15T05:33:43+5:302019-10-15T05:34:11+5:30
कुटुंबीयांची उच्च न्यायालयाकडे मागणी : अर्ज करण्याचे निर्देश
मुंबई : गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्यावा, अशी मागणी पानसरे कुुटुंबीयांनी उच्च न्यायालयात सोमवारी केली. त्यावर न्यायालयाने पानसरे यांच्या कुटुंबीयांना तसा अर्ज करण्याचे निर्देश दिले.
तपासात काही प्रगती न झाल्याने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने नाराजी दर्शविली. ‘दुसऱ्या तपास यंत्रणांवर विसंबून राहू नका. तुम्ही स्वतंत्रपणे तपास करा,’ असे न्यायालयाने एसआयटीला बजावले. त्यावर सरकारी वकील अशोक मुंदर्गी यांनी सांगितले की, कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे एसआयटी दीड महिने तपास करू शकली नाही. दाभोलकर व कलबुर्गी हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींकडून पानसरे हत्येचे धागेदोरे हाती लागत आहेत का, याचा तपास एसआयटी करत आहे. दाभोलकर यांच्या हत्येतील पिस्तूल ठाणे खाडीत टाकल्याची माहिती शरद कळस्करने सीबीआयला दिली होती. ते शोधण्यासाठी परदेशातून डायव्हर्स मागविले. ते हाती न लागल्याने शोधासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली. मुदतवाढ मिळेल, परंतु आरोपपत्र दाखलच्या मुदतीधी शोध संपवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपींवर महिन्यात आरोपपत्र दाखल करू - सीबीआय
आरोपी अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रांत भावे यांच्यावर एका महिन्यात आरोपपत्र दाखल करू, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयात दिली. पुनाळेकरवर आरोपी शरद कळसकर याला शस्त्र नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा तर भावे याच्यावर रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.