रस्ते घोटाळाच नव्हे तर वाट्टेल त्याची चौकशी करा : उद्धव ठाकरेंचा टोला
By admin | Published: July 24, 2016 03:19 AM2016-07-24T03:19:13+5:302016-07-24T03:19:13+5:30
मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत पहिले पत्र महापौरांनी दिले होते. आम्ही पैसे खाणारे असतो तर हे पत्र त्यांनी दिले असते का? रस्ता, नालेसफाई घोटाळा किंवा आणखी काय काय वाट्टेल त्याची
मुंबई - मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत पहिले पत्र महापौरांनी दिले होते. आम्ही पैसे खाणारे असतो तर हे पत्र त्यांनी दिले असते का? रस्ता, नालेसफाई घोटाळा किंवा आणखी काय काय वाट्टेल त्याची चौकशी करा. शिवसेना कुठल्याही चौकशीत सापडणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा रंगशारदा सभागृहात झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रस्ते दुरूस्तीच्या घोटाळ्याबाबत विरोधकांसह भाजपाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचा उल्लेख न करता त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘महापालिका असेल, केंद्र किंवा राज्य सरकार असेल. जिथे जे काही पटत नाही त्यावर बोलत राहणारच. जिथे महापालिका चुकते तिथे आपण सडकून काढू. पण महापलिका किती काम करते याचे कधी कोणी कौतुक करीत नाही, याचे मला नेहमी शल्य राहिले आहे. यंदा भरपूर पाऊस होऊनही कोठेही पाणी तुंबलेले नाही. ते चांगले काम झाले. पण आता यांना खड्डे दिसायला लागले. काही वेळा असे वाटते पाणी तुंबलेले बरे की काय, त्यामुळे खड्डे नाही दिसत. जिथे चूक आहे तिथे आहेच. लगेच त्यात काही घोटाळा आहे, असा आरोप केला जातो. सध्या चौकशीचे फॅड आले आहे, ठिक आहे, करा वाट्टेल त्याची चौकशी करा. शिवसेनेला त्याची पर्वा नाही. कारण एकाही खोट्या पैशाचे काम शिवसेनेने केलेले नाही.
गणेशोत्सव मंडळांवर अनावश्यक बंधने लादली जात असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उत्सव आपण इथे साजरे करायचे नाही तर काय पाकिस्तानात साजरे करायचे का? उत्सव म्हटल्यावर थोडे इकडे तिकडे होतेच. समजून घेतले पाहिजे. सर्व गणेश मंडळे आपली आहेत. त्यांना मी शिवसैनिक समजतो. यात राजकारण आणायचे नाही म्हटले तरी एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे, की सामाजिक भान असलेला शिवसेना एकमेव पक्ष आहे. निवडणुकीच्या तोंडावर मंडळे विकत घेण्याचा प्रयत्न होतो. पण आमची मंडळे आमच्याकडेच आहेत. कोणी ती विकत घेऊ शकत नाहीत. मंडळांनी काळजी क^रू नये. कुठल्याही अडचणी आल्या तर शिवसेना पाठीशी असेल. गणेश मंडळांवर इतकी बंधने का लादतात समजत नाही.’
नागरिकांना इतर पक्षांपेक्षा शिवसेना जवळची वाटते. एका विश्वासाने आपल्या सोबत राहिली आहे. तो सार्थकी ठरविण्याचे काम सेनेने चार वेळा केले आहे आणि येत्या फेब्रुवारीत पाचव्यांदा करणार असून त्याची मोठी जबाबदारी शिवसैनिकांवर आहे. आयुक्तांनी खूप छान समजावले की डेंग्यू कसा होतो. नाही तर एखाद्दुसरी केस सापडली तर सुरू होईल महापालिकेत डेंग्यू घोटाळा. कुणाला काही कळते की नाही माहीत नाही. पण उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार विरोधकांकडून सुरूआहे, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)