मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 04:38 PM2017-09-01T16:38:16+5:302017-09-01T16:41:58+5:30

मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला.

Investigate the Rs 650 crore SIT probe for Mithi river and Nalasefi: Radhakrishna Vikhe Patil | मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील

मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील

Next
ठळक मुद्देमिठी नदीच्या आणि नालेसफाईच्या कामावर झालेल्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटीमार्फत चौकशी करामुंबई महापालिकेचे पहारेकरी म्हणवून घेणारी भाजपा आता निद्रिस्त

नाशिक, दि. 1 -  मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला. मिठी नदीच्या आणि नालेसफाईच्या कामावर झालेल्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना-भाजपावर टीका केली. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झालेला असतानाही नालेसफाईच्या कामांचा अहवाल विधी मंडळात सरकारने जाणीवपूर्वक मांडला नाही असे सांगतानाच मुंबई महापालिकेचे पहारेकरी म्हणवून घेणारी भाजपा आता निद्रिस्त असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखविण्यापर्यंत सरकारची मजल गेली असून आता माफी मागण्याची नामुष्की आल्याने मुख्यमंत्री आणि महाधिवकता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. 

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात घडलं माणुसकीचे दर्शन-
मुसळधार पावसानं मंगळवारी ( 29 ऑगस्ट ) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. मात्र भर पावसातही माणुसकीला पूर आला होता.  मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत मुंबई स्पिरीटचं दर्शन घडवलं. कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावरही माणुसकीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. ऑडी कारचे वायपर नीट सुरू नव्हते, त्यामुळे मुसळधार पावसात कार चालकाला गाडी चालवणे कठीण झाले. यावेळी एक व्यक्ती त्या कारचालकाच्या मदतीला धावून आला व  स्वतः गाडीवर बसून तो गाडीची काच हातानं पुसू लागला शिवाय कारचालकाला गाडी कशी वळवावी, याचे मार्गदर्शनही केली.
दरम्यान, अतिवृष्टीने मुंबई आणि परिसरातील जनजीवन ठप्प झाले असताना अनेक ठिकाणी  ‘मुंबई स्पिरीट’चे दर्शन घडविले. अनेक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांच्या जोडीला सामान्य मुंबईकरांनीही आपापल्या क्षमतेनुसार मदतकार्यात सहभाग घेतला. अनेक मुंबईकरांनी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आदी सोशल मीडियावर स्वत:चा मोबाइल नंबर, घरचा पत्ता देत अडकलेल्या प्रवाशांसाठी स्वत:च्या घराचे दरवाजे उघडे केले.
अतिवृष्टीमुळे सायंकाळपर्यंत लोकल आणि बेस्ट बसेसची वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे ओला, उबेर आणि टॅक्सीही निरुपयोगी ठरत होत्या. पावसात अडकून पडलेल्या या मंडळीना मदतीचा हात देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. सोशल मीडियावर स्वत:चा पत्ता आणि फोन नंबर टाकून विनसंकोच घरी येण्याचे निमंत्रण दिले. दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळ राहणारे संतोष पावसकर यांनी फेसबुक तसेच व्हॉटस्अपवर मसेज टाकून आसपास अडकलेल्या लोकांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. दादर, लोअर परळ, प्रभादेवी, एलफिन्स्टन परिसरातील अनेक कार्यालयांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली. मात्र, ऑफीसबाहेर पडलेली मंडळी पावसातच अडकली.
गुरूद्वारासह जैन संघ व मशिदींचा आधार
गणेशोत्सव मंडळांसह येथील गुरूद्वारा, मशिद आणि जैन संघांनी महापुरात अडकलेल्या मुंबईकरांसाठी जेवणासह राहण्याची व्यवस्था केली. दादर गुरुद्वारामध्ये लंगरची व्यवस्था केली होती. फोर्ट भागात अडकलेल्या व्यक्तींसाठी सीएसएमटीजवळील बोरा बाजार मार्गावर श्री फोर्ट जैन संघामध्ये लोकांच्या जेवणाची व्यवस्था होती.
उत्सव मंडपे रिकामी, भाविकांचा पूर ओसरला
सतत कोसळणा-या पावसाचा फटका भाविकांनाही बसला. सकाळी उत्साहात भाविक गणपती दर्शनासाठी घरातून बाहेर पडले होते. पण, दुपारपर्यंत पावसाचा वाढता जोर पाहून भाविकांनी घरी परतण्यास पसंती दिली. लालबाग, परळ, दादर भागात पाणी साचायला लागल्याने येथील प्रसिद्ध मंडळांमध्येही भाविकांची गर्दी दुपारनंतर कमी झाल्याचे दिसून आले. परळ येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या गणेशमूर्तीसमोरील सजावटीचा काही भाग दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळला. यात हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने सजावटीचा कोसळलेला भाग बाजूला करण्यात आल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. मंगळवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने विसर्जनासाठी कसे जायचे? असा प्रश्न अनेक भाविकांना भेडसावत होता. मुसळधार पावसामुळे गणपती विसर्जनासाठी अनेक विघ्न आली. तरीही जमेल तसा भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी येणाºया भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील चौपाट्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते.
पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी विसर्जनसाठी चौपाट्यांवर तसेच कृत्रिम तलावाकडे आलेल्या भाविकांना मदत केली. दुपारी साडेचारच्या सुमारास भरती असल्यामुळे त्यावेळी भाविक विसर्जनासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर सायंकाळी गणपती विसर्जनासाठी गर्दी होत होती. 
 

Web Title: Investigate the Rs 650 crore SIT probe for Mithi river and Nalasefi: Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.