उत्तरपत्रिका घोटाळ््याचा तपास सीआयडीकडे द्या
By admin | Published: May 24, 2016 03:09 AM2016-05-24T03:09:48+5:302016-05-24T03:09:48+5:30
मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या घोटाळ्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेला (सीआयडी) देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने
मुंबई : मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या घोटाळ्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेला (सीआयडी) देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यासंबंधीचा ठराव सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच उत्तरपत्रिका घोटाळ्यातील दोघा संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून प्रशासनाने सोमवारी एकाचवेळी परीक्षा विभागातील १३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.
उत्तरपत्रिका घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सोमवारी कुलगुरू संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे, असा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आला व तो मंजूर झाला. घोटाळ््याशी संबंधित अन्य सहा अस्थायी कर्मचाऱ्यांबाबत न्यायालयीन सल्ला घेऊन कारवाई करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागातील १३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्याचे सांगितले.
त्याचबरोबर प्रशासनिक बदल आणि परीक्षा भवनातील सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. परीक्षा भवनात सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरक्षा यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी इस्त्रायल सरकारची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा भवनात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये-जा करताना तपासणी करण्यात येणार असून परीक्षा भवनात मोबाइल फोन वापरावर बंदी घातली जावी, असाही निर्णय झाला आहे.
परीक्षा भवनमध्ये सीसीटीव्ही
गैरप्रकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत परीक्षा भवन तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचा नियंत्रण कक्ष, परीक्षा विभागात काम करणाऱ्यांवर‘अॅक्सेस कंट्रोल’ व घुसखोरी रोखण्यासाठी डिटेक्शन सॉफ्टवेअरमार्फत देखरेख आदी उपाययोजना करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल होणार
भांडुप पोलिसांनी उघड केलेल्या मुंबई विद्यापीठातील पेपर घोटाळयामध्ये आता अनेक मोठ्या अधिकाऱ्यांसह काही एजंटांवरदेखील अटकेची टांगती तलवार आहे. शिवाय या एजंटना पैसे देऊन पुन्हा पेपर लिहण्यासाठी घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली . आठ कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन या विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाणार असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. तसेच पकडण्यात आलेल्या आरोपींसोबत काही एजंट काम करत होते. या एजंटांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.