‘त्या’ एटीएस अधिकाऱ्यांची चौकशी करा, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
By admin | Published: January 4, 2017 01:49 AM2017-01-04T01:49:54+5:302017-01-04T01:49:54+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा, अशी मागणी रामचंद्र कलसंग्रा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. रामचंद्र कलसंग्राची मालेगाव बॉम्बस्फोट
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा, अशी मागणी रामचंद्र कलसंग्रा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. रामचंद्र कलसंग्राची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी गोळी घालून हत्या केल्याचा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर कलसंग्रा कुटुंबीयांनी मुजावर यांच्या आरोपाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
कलसंग्रा कुटुंबीयांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाचा फोडली. कलसंग्रा यांचा भाऊ शिवनारायण याने एटीएस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
ते म्हणाले की, राजकीय षड्यंत्रापोटी रामचंद्र यांच्यासह अनेकांना एटीएस अधिकाऱ्यांनी गायब केले. आपण स्वत: त्यातील एक आरोपी आहोत. थेट घरातून उचलून नेऊन बेदम मारहाण एटीएस अधिकाऱ्यांनी केली. कोऱ्या कागदांवर सही घेणे, खोटे जबाब वदवून घेण्याचे कामही दहशतीच्या जोरावर एटीएस अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, तपासात बेपत्ता झालेल्या दिलीप पाटीदार यांचा शोध घेण्याची मागणी त्यांचा भाऊ रामस्वरूप पाटीदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (प्रतिनिधी)
तपासावर प्रश्नचिन्ह
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दिलीप नहार आणि इतर कुटुंबीयांनीही एटीएस अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित आरोपींनी एटीएसने लावलेल्या आरोपांचे खंडन केले; शिवाय एटीएस अधिकारी या प्रकरणात जबरदस्तीने आपल्याला गोवत असल्याचा आरोप केला.