३० कोटींच्या बोगस बीटी बियाण्यांचा तपास थंडबस्त्यात
By admin | Published: June 26, 2014 12:50 AM2014-06-26T00:50:21+5:302014-06-26T01:21:02+5:30
कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पश्चिम विदर्भातील बोगस बियाणे-खते विक्रेत्यांचा पर्दाफाश केला. त्यांच्याविरुद्ध १० पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले. परंतु पोलिसांना ‘क्रेडिट आणि
१० गुन्हे दाखल : पोलिसांना ‘इन्टरेस्ट’ नाही, कृषी खात्याचे परिश्रम व्यर्थ
यवतमाळ : कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पश्चिम विदर्भातील बोगस बियाणे-खते विक्रेत्यांचा पर्दाफाश केला. त्यांच्याविरुद्ध १० पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले. परंतु पोलिसांना ‘क्रेडिट आणि इन्टरेस्ट’ नसल्याने या गुन्ह्यांचा तपास थंडबस्त्यात पडला आहे. पर्यायाने कृषी विभागाचे परिश्रम व्यर्थ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची विक्री होते. यावरील नियंत्रणासाठी विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात ६२ पथके कार्यरत आहेत. कोणत्या भागात बोगस बियाणे आणले जात आहे, त्याचे विक्रेते, खरेदीदार कोण याची माहिती काढणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि रंगेहात पकडण्याची कामगिरी अगदी पोलिसांप्रमाणे कृषी विभागाच्या पथकांमार्फत केली जात आहे. बोगस बियाणे विक्रीची खातरजमा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी अनेक कृषी केंद्रांमध्ये स्वत: शेतकरी (बनावट ग्राहक) बनूनही गेले. त्यात आतापर्यंत ३० कोटी रुपयांचे बोगस बियाणे, खते जप्त करण्यात आली. पुसद शहर, यवतमाळ शहर, राळेगाव, पांढरकवडा, बाभूळगाव, वाशिम, बडनेरा, मोर्शी, आकोट, खामगाव या दहा ठिकाणी बियाणे विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरण तयार करून पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. आरोपी कोण, त्याचा पत्ता, पंचनामे, साक्षीदार व अन्य सविस्तर माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु त्यानंतरही पोलिस तपासाला वेग नसल्याचे आढळून आले आहे.
अनेक ठिकाणी आपल्याला श्रेय मिळणार नाही, म्हणून पोलिसांनी तपासच थंडबस्त्यात ठेवला आहे. यातील हवे असलेले आरोपी चक्क पोलीस ठाण्यासमोरुन जात असतानाही पोलिसांनी त्यांना अटक करण्याची तसदी घेतली नाही. याचा प्रत्यय कृषी विभागाला यवतमाळ शहरात आला. कित्येक ठिकाणी तर संबंधित पोलिसांनी कृषी विभागाला सहकार्यच केले नाही. त्यासाठी थेट एसडीपीओ, एसपींना संपर्क करावा लागला. त्यानंतर कुठे कृषी अधिकाऱ्यांना धाडीसाठी मदत मिळाली.
राळेगावच्या ठाणेदाराने तर ‘तुम्ही बोगस बियाणे विक्रेत्याला पकडलेच कसे, आमचे काम तुम्ही करायला लागले का’ अशा शब्दात वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याला सुनावले. राळेगाव पोलीस सहकार्य करीत नसल्याचे पाहून अखेर कारवाईसाठी यवतमाळहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)