नोटाजप्ती प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरूच
By admin | Published: March 4, 2017 12:52 AM2017-03-04T00:52:34+5:302017-03-04T00:52:34+5:30
चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शुक्रवारी दिली.
पुणे : चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शुक्रवारी दिली. २ फेब्रुवारी रोजी कोथरूड पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा जप्त केल्या होत्या. स्टेशन डायरीला मात्र केवळ २० लाखांच्या नोटा जप्त केल्याची नोंद झाली.
प्रसारमाध्यमांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला. २४ फेब्रुवारी रोजी दिघीमध्ये १ कोटी ३६ लाख २६ हजार रुपये किमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्या गेल्या, त्याचीही तत्काळ माहिती देण्यात आली नाही. हेही प्रकरण १ मार्च रोजी उजेडात आले. कोथरूड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांच्यासह ६ जणांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. सहायक आयुक्तांमार्फत सुरू असलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या जबाबाची नोंद करण्यात आली असून, अद्यापही चौकशी सुरू असल्याचे हिरमेठ यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)