CBI च्या पथकाकडून आराेपींच्या नेटवर्कचा शाेध; बिहारच्या परीक्षा केंद्राची प्रवेशपत्र आढळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 05:31 AM2024-07-04T05:31:52+5:302024-07-04T05:32:23+5:30
बिहारमधील केंद्रांवर परीक्षा दिलेल्या १५ हजार विद्यार्थ्यांच्या गुणांचा ताळेबंद तपासणार
राजकुमार जोंधळे
लातूर - नीटमध्ये (नॅशनल एलिजीबिलिटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून लातुरात घडलेल्या फसवणूक प्रकरणाचा बिहार व इतर राज्यातील गुन्ह्यांशी संबंध आहे का? याची पडताळणी तसेच आराेपींच्या नेटवर्कचा सीबीआय शाेध घेत आहे. दरम्यान, बिहारमध्ये संशयास्पद केंद्रावर परीक्षा दिलेल्या जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांच्या गुणांचाही ताळेबंद सीबीआय लावत आहे. तसेच आराेपींकडे सापडलेल्या बिहारच्या दहा प्रवेशपत्रांचाही संदर्भ तपासला जात आहे.
नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चारपैकी दाेघांना स्थानिक तपास यंत्रणांनी अटक केली असून, ते सध्याला सीबीआयच्या पाेलिस काेठडीत आहेत. स्थानिक तपास यंत्रणांनी केलेल्या चाैकशीत बिहार राज्यातील परीक्षा केंद्राची प्रवेशपत्रे आढळून आली आहेत. आता सीबीआयकडून काेठडीत असलेले आराेपी, दिल्लीतील गंगाधार आणि पसार झालेला इरण्णा काेनगलवारचा बिहारमधील काेणा-काेणाशी संपर्क आहे, याचाही तपास केला जात आहे.
दहा लाेकांचे काम केल्याचा प्रकार समाेर
स्थानिक तपास यंत्रणांच्या चाैकशीत दहा लाेकांची कामे केल्याचा संदर्भ समाेर आला आहे. मात्र, हे दहा जण काेण आहेत? याचा मात्र खुलासा केला नाही. दरम्यान, या लाेकांची नावे सीबीआयच्या पथकाला हवी आहेत. त्याचा आणि बिहारमधील संशयास्पद परीक्षा केंद्रांचा नेमका काय संबंध आहे? याचाही तपास केला जात आहे.
नीटबराेबरच इतर प्रवेशपत्रे आढळली
सीबीआय काेठडीतील दाेघा आराेपींच्या माेबाइलमध्ये नीटबराेबरच इतर परीक्षांचीही प्रवेशपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे या परीक्षेतही गुणवाढीचा संशय तपास पथकाला आहे. यातील किती विद्यार्थ्यांचा आराेपींशी संबंध आला आहे, याचाही शाेध ते घेणार आहेत.
दाेघांच्या चाैकशीत तीन संशयितांची नावे उघड
तपास यंत्रणांनी केलेल्या चाैकशीत अन्य तिघा संशयितांची नावे समाेर आली आहेत. या तिघांचा आणि काेठडीत असलेल्या जलीलखाँ पठाण, संजय जाधव याचा आणि पसार झालेल्या इरण्णा काेनगलवारचा नेमका काय संबंध आहे, याचाही शाेध सीबीआयकडून घेतला जात आहे.