‘राधे माँ’ची गुन्हे शाखेकडून चौकशी
By admin | Published: August 8, 2015 01:30 AM2015-08-08T01:30:37+5:302015-08-08T01:30:37+5:30
मुंबईतील वादग्रस्त राधे माँ शुक्रवारी विमानाने औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी दोन तास चौकशी केली. त्यांच्यासोबत
औरंगाबाद/मुंबई : मुंबईतील वादग्रस्त राधे माँ शुक्रवारी विमानाने औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी दोन तास चौकशी केली. त्यांच्यासोबत १२ भक्त असून, ते मिटमिटा येथील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. राधे माँविरोधात मुंबईतील कांदिवली पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
राधे माँ यांचे येथे आगमन होताच आलिशान कार त्यांच्या सेवेत दाखल झाली. त्यांच्यासोबत साध्वी मसी, त्यांचा स्वीय सहायक संजीव गुप्ता, विशाल शर्मा, एक सुरक्षारक्षक आणि इतर महिला होत्या. मिटमिटा येथील हॉटेलात चार कॉटेज संजीव गुप्ता यांच्या नावे बुक करण्यात आल्या आहेत. तेथे सर्व सकाळपासून थांबलेले होते. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांच्या पथकाने त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्या पुन्हा ध्यानधारणेस बसल्या. त्यांच्या दर्शनासाठी काही भक्त दाखल झाले होते. दिल्ली येथूनही एक वृद्ध जोडपे त्यांच्या दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादेत आले. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंत राधे माँ ध्यानधारणेतच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोणालाही त्यांना भेटता आले नसल्याचे समजते.
राधे माँ यांना नांदेड गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी जायचे असल्याने त्या औरंगाबादेत आल्याचे त्यांचे स्वीय सहायक संजीव गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की, माताजींचा हा ठरलेला कार्यक्रम असून, त्यात कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपूर्वी त्या पंजाबमध्ये होत्या. तेथे त्यांचा सत्संग झाला.
राधे माँचा काहीही संबंध नसताना त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपासून पती-पत्नीमध्ये घरगुती भांडण सुरू होते. हा वाद कोर्टात सुरू असताना अचानक दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडणार आहोत. सत्य समोर येईल, असे गुप्ता म्हणाले.
पोलीस धाडणार समन्स, सोमवारी होऊ शकते चौकशी
सुखविंदर कौर उर्फ ‘राधे माँ’ला समन्स पाठवून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेण्याचा विचार कांदिवली पोलीस करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी तिची चौकशी होण्याची शक्यता आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून मुंबईतून पळ काढलेली राधे माँ शुक्रवारी औरंगाबादेत होती. त्याआधी ती दिल्लीतही दिसली होती. कांदिवलीत राहाणाऱ्या निकी गुप्ता या ३२वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून दंडाधिकारी न्यायालयाने राधे माँसह निकीच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी राधे माँसह एकूण सात जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा नोंदविला.
निकीच्या तक्रारीनुसार सासरच्या मंडळींनी राधे माँच्या इशाऱ्यावरून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला सुरू केला होता. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी तक्रारदार निकी, तिचे पालक तसेच अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत; तर आरोपी करण्यात आलेल्या सासरच्या मंडळींची चौकशी करून त्यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत.
(प्रतिनिधी)