महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने व्हावा
By admin | Published: March 10, 2016 03:47 AM2016-03-10T03:47:17+5:302016-03-10T03:47:17+5:30
महिलांवरील अत्याचारात वाढ होणे हे चिंतेची बाब असली तरी त्यासंबंधी अधिकाधिक गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे. पोलिसांकडून त्याचा तपासही जलदगतीने झाला
मुंबई: महिलांवरील अत्याचारात वाढ होणे हे चिंतेची बाब असली तरी त्यासंबंधी अधिकाधिक गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे. पोलिसांकडून त्याचा तपासही जलदगतीने झाला तरच गुन्हेगारांवर आळा बसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
मुंबई पोलिसांच्या १०३ या महिला हेल्पलाईनच्या माहितीपटाचे अनावरण व वुमेन्स जर्नालिस्ट असोसिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी महिलांच्या सुरक्षेबाबतचे मोबाइल अॅप येत्या महिन्याअखेरपर्यंत मुंबईत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या सर्वांची नोंद पोलिसांकडे होत नाहीत. अधिकाधिक नोंद झाल्यास त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. तरच गुन्हेगारांना आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक असल्याचे सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी महिला पत्रकारांना भेडसाविणाऱ्या समस्या विषद केल्या. स्वागत संघटनेच्या अध्यक्षा मनीषा गुरव यांनी केले. सचिव पूनम अपराज यांनी
आभार मानले. (प्रतिनिधी)