भोंदूबाबाच्या दृष्टीनेही तपास
By admin | Published: February 29, 2016 03:38 AM2016-02-29T03:38:21+5:302016-02-29T03:38:21+5:30
वरेकर कु टुंबीयांना दोन वर्षांपूर्वी कोणी एका ‘भोंदू’बाबाने औषध दिले होते. ते प्राशन केल्यामुळे या कुटुंबीयांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
पंकज रोडेकर, ठाणे
वरेकर कु टुंबीयांना दोन वर्षांपूर्वी कोणी एका ‘भोंदू’बाबाने औषध दिले होते. ते प्राशन केल्यामुळे या कुटुंबीयांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या चर्चेबरोबर मारेकरी हुसनैनविरोधात किंवा वरेकर कुटुंबीयांविरोधात कोणती तक्रार आहे का, अशा विविध अंगांनी पोलिसांनी आता तपास सुरू केला, तसेच विविध घेतलेल्या नमुन्यांसह शवविच्छेदनाचा अहवाल आणि बचावलेल्या बहिणीच्या जबानीनंतर यामागील रहस्याचा उलगडा होणार आहे.
रविवारी पहाटे हसनैन याने आईवडील, पत्नी, मुलांसह बहिणी आणि भाचा-भाची अशी १४ जणांची गळा चिरून हत्या करून, त्याने आत्महत्या केल्याची बातमी सकाळीच वाऱ्यासारखी पसरली. या भीषण हत्याकांडामुळे या कुटुंबीयांना दोन वर्षांपूर्वी विषबाधा झाल्याने, रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याच्या वृत्ताचीही उघडउघड शहरात चर्चा सुरू झाली. त्यामुळे तर्कवितर्क मांडले जाऊ लागले आहेत.
याबाबत, तेथील स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना, वरेकर कुटुंबीयांना विषबाधा झाल्याचे त्यांनाही समजल्याची प्रतिक्रिया दिली, तसेच मयत अन्वर वरेकर यांचा भाऊ रिझवान इस्माईल वरेकर यांनी, दोन वर्षांपूर्वी एनर्जी ड्रिंक म्हणून एका बाबाने या कुटुंबाला एक औषध दिले होते. त्यांना दिलेल्या त्या औषधाच्या मात्रेपेक्षा अधिक मात्रा घेतल्याने, त्यांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यामध्ये लहान मुलांचा समावेश नव्हता, पण ते कोणी दिले, याबाबत त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, चर्चांवर भाष्य करता येणार नाही, पण त्यांनी घेतलेल्या औषधासह ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले, तेथील रेकॉर्ड गोळा करण्यात येणार आहे, तसेच या कुटुंबीयांविरोधात कोणती तक्रार आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर, हसनैनच्या मोबाइल आणि संगणकावरील रेकॉर्डही तपासण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच त्याच्या कामाच्या ठिकाणी एक पथक पाठवले आहे.
अन्वर वरेकर दर्ग्याचे ट्रस्टी :
मूळचे कासारवडवली गावातील रहिवासी असलेले मयत अन्वर वरेकर (५८) हे वीरा केमिकल कंपनीत कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर इस्टेट एजंट म्हणून काम करीत, तसेच ते जुने रहिवासी असल्याने, कासारवडवली-आनंदनगर येथील परदेशीबाबा या दर्ग्यात ट्रस्टी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.