प्राइम डेव्हलपर्सची ईडीकडून चौकशी
By admin | Published: December 13, 2015 03:01 AM2015-12-13T03:01:46+5:302015-12-13T03:01:46+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाशी निगडित प्राइम डेव्हलपर्स आणि बिल्डर्सने लार्सन अॅण्ड टुब्रोकडून
- डिप्पी वांकाणी, मुंबई
महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाशी निगडित प्राइम डेव्हलपर्स आणि बिल्डर्सने लार्सन अॅण्ड टुब्रोकडून मिळालेल्या २०० कोटी रुपयांतून कोणकोणत्या मालमत्ता खरेदी केल्या, याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.
निवासी इमारतींचा प्रकल्प विकसित करण्याचे अधिकार लार्सन अँड टुब्रो कंपनीने ४८० कोटी रुपयांना घेतले होते. ते त्यांनी चमणकर एन्टरप्राईसला २८० कोटी रुपयांना व प्राइम डेव्हलपर्स अँड बिल्डर्सना २०० कोटी रुपयांना विकले होते.
विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘लार्सन अँड टुब्रोकडून प्राइम डेव्हलपर्सने २०० कोटी रुपये, तर चमणकर एंटरप्राइजेसने २८० कोटी रुपये घेतले. महाराष्ट्र सदन, अंधेरी आर.टी.ओ. क्वॉर्टर्स आणि विश्रामगृह यांच्या बदल्यात ४३ हजार चौरस मीटर जमीन विकसित करण्याचे अधिकार चमणकर एंटरप्राइजेसला मिळाले होते. तथापि, या कामी चमणकर एंटरप्राइजेसने प्रमुख वित्तपुरवठादार म्हणून प्राइम डेव्हलपर्सला खेचले आणि नफ्यातील ६० टक्के वाटा देण्याचेही कबूल केले. त्या बदल्यात प्राइम डेव्हलपर्सने हेच काम ८५० कोटी रुपयांत करण्यासाठी लार्सन अँड टुब्रोला खेचले. त्यापैकी लार्सन अँड टुब्रोने ४८० कोटी रुपये खर्च केले. चमणकर एंटरप्राइजेसने २८० कोटी रुपयांचा उपयोग करीत महाराष्ट्र सदन आणि अन्य इमारती बांधल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या २०० कोटी रुपयांतून प्राइम डेव्हलपर्सने खरेदी केलेल्या इतर मालमत्तांचा आम्ही आता शोध घेत आहोत,’ असे हा अधिकारी म्हणाला.
भुजबळ कुटुंबीयांचाही संबंध
महाराष्ट्र सदन आणि कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी १७ जून रोजी अंमलबजावणी विभागाने फिर्याद नोंदविली आहे. या प्रकरणी भुजबळ यांच्या निके एंटरप्राइजेझेस, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इदिन फर्निचर या तीन कंपन्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी समीर आणि पंकज भुजबळ निके व ओरिजिन एंटरप्राइजेसचे संचालक आहेत. समीर पत्नी शेफाली आणि पंकज यांची पत्नी विशाखा इदिन फर्निचरच्या संचालक आहेत.
महाराष्ट्र सदन बांधण्याचे अधिकार मिळालेल्या चमणकर एंटरप्राइजेसने या कंपन्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली आहे. याच काळात नंतर आलेल्या प्राइम डेव्हलपर्सनेही या तीन कंपन्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याचे हा अधिकारी म्हणाला.
महाराष्ट्र सदनप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सप्टेंबरमध्ये चमणकर एंटरप्राइजेसच्या १७.३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.