ममता कुलकर्णीला फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरची चौकशी
By admin | Published: June 10, 2016 02:29 AM2016-06-10T02:29:09+5:302016-06-10T02:29:09+5:30
चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीने अविवाहित असताना सुमारे वीस वर्षांपूर्वी आपल्याकडून फ्लॅट खरेदी केले होते
मुंबई : चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीने अविवाहित असताना सुमारे वीस वर्षांपूर्वी आपल्याकडून फ्लॅट खरेदी केले होते, असा खुलासा बिल्डर शब्बीर नूर मोहंमद पटेल याने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
ठाणे येथे हस्तगत केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी या दोघांची नावे पुढे आल्याने ठाणे पोलिसांनी त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यास सुरुवात केली आहे.
चौकशीदरम्यान ममता कुलकर्णीने शब्बीर नूर मोहंमद पटेल याच्याकडून अंधेरी परिसरात चार फ्लॅट खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी या बिल्डरची चौकशी सुरू केली. त्यावर ममता कुलकर्णी ही टॉपची अभिनेत्री असताना तिने आणि तिची आई मीरा कुलकर्णी यांनी आपल्याकडून अंधेरी येथील यारी रोडवरील अर्शी कॉम्प्लेक्स परिसरात चार फ्लॅट खरेदी केले होते. त्याचा विक्रीव्यवहार कायदेशीर असून विक्रीखतही आपल्याकडे आहे. त्यानंतरच्या काळात तिचा विवाह झाल्याने या फ्लॅट खरेदीशी विकी गोस्वामीचा काहीही संबंध नसल्याचे बिल्डरने या पत्रात म्हटले आहे. आपल्या काही नातेवाइकांशी वाद असल्याने त्यांनी चुकीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवून आपल्याला नाहक या प्रकरणात गोवल्याचेही बिल्डरने नमूद केले आहे.