अवजड वाहतुकीसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: October 3, 2016 05:03 AM2016-10-03T05:03:37+5:302016-10-03T05:03:37+5:30
जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
आविष्कार देसाई,
अलिबाग- अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. अलिबाग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहतूक होताना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्याचप्रमाणे, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाययोजना म्हणून विशेष कॉरिडोर निर्माण करणे गरजेचे होते. यासाठी जेएनपीटी ते बुटीबोरी हा मार्ग विशेष कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे गीते यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरला या नव्याने विकसित होणाऱ्या विशेष कॉरिडोरची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने, उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बंदरांचा विकास साधण्यासाठी रोहा-दिघी पोर्ट, जयगड-डिंगणी हे मार्ग रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, चिपळूण ते कराड या मार्गालाही फास्ट ट्रॅकवर आणण्यात येणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.
>किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च
पाकिस्तानकडून गेली २० वर्षे छुपे हल्ले देशाने झेलले आहेत. उरी हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पलटवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च आहे. त्या दिशेने सुरक्षेची उपाययोजना केंद्र सरकार करीत आहे.