औरंगाबादमध्ये कोस्मो फिल्म कंपनीची गुंतवणूक
By Admin | Published: July 29, 2016 01:52 AM2016-07-29T01:52:19+5:302016-07-29T01:52:19+5:30
कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे.
मुंबई : कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे. या नव्या प्रकल्पामुळे पाचशे जणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
कोस्मो फिल्मस् कंपनीचे गुजरात आणि वाळुज येथे प्रकल्प आहेत. याव्यतिरिक्त कंपनीने आणखी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून वाळुज औद्योगिक वसाहतीत नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून औरंगाबाद परिसरातील शेंद्रा व बिडकीन येथे औद्योगिक वसाहत निर्माण होत आहे. या सर्व विकास कामामुळे आणि राज्याने स्वीकारलेल्या उद्योगस्नेही धोरणामुळे विविध कंपन्या औरंगाबाद परिसरात उद्योग उभारण्यासाठी इच्छुक आहेत. कोस्मो फिल्मस् कंपनीचे वाळूंज औद्योगिक वसाहतीमध्ये यापूर्वीच उत्पादन सुरू असून आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पामधून पाचशे जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)