‘त्या’ कंपनीची पाकिस्तानात गुंतवणूक; सरकारी कंपन्या बारसू रिफायनरी तयार करतील : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 09:28 AM2023-08-05T09:28:38+5:302023-08-05T09:29:09+5:30

सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.   

Investment of 'that' company in Pakistan; Govt companies to build Barsu refinery says Devendra Fadnavis | ‘त्या’ कंपनीची पाकिस्तानात गुंतवणूक; सरकारी कंपन्या बारसू रिफायनरी तयार करतील : देवेंद्र फडणवीस

‘त्या’ कंपनीची पाकिस्तानात गुंतवणूक; सरकारी कंपन्या बारसू रिफायनरी तयार करतील : देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

मुंबई : बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी आराम्को कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याबाबतच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुजोरा दिला. सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.   

अंतिम आठवडा प्रस्तावाला फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बारसूचे बोअर होल्स घेताना काही गावकऱ्यांनी विरोध केला. त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. कातळशिल्पाचे संवर्धन झालेच पाहिजे. राज्य हिताच्या गोष्टींना विरोध करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

बारसू विरोधकांना बंगळुरूतून पैसा 
ज्यांना या देशाचा विकास नकोय तीच माणसे आरे, बुलेट ट्रेन, बारसूच्या आंदोलनात दिसताहेत. यातील काही माणसे नर्मदा आंदोलनातही होती. या आंदोलकांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर ही माणसे वारंवार बंगळुरूला जाताहेत. यांच्या अकांउंटमध्ये तिथून पैसे येतात. ग्रीन पीस या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात हे लोक आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

उद्योगात महाराष्ट्र पुन्हा अव्वल 
 हे सरकार आल्यावर १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२३ या एक वर्षात १०९ ऑफर लेटर दिले असून एकूण १ लाख ४ हजार ८२५ कोटींची गुंतवणूक झाली असून ७८६६५ रोजगार उपलब्ध होणार आहेत. दावोसमध्ये २५ सामंजस्य करार होऊन ८० हजार कोटींची गुंतवणूक झाली असून ९६ हजार रोजगार निर्माण झाले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात महिला सुरक्षितच  
महिला अत्याचारासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल होऊन ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या केंद्राच्या निर्देशानुसार ते केले जाऊन गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अपहरणासंदर्भात राज्याचा क्रमांक १० वा असून, राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असे चित्र निर्माण होणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुपोषण कमी होतेय 
मार्च २०२१         १.४३ टक्के 
मार्च २०२२        १.२४ टक्के 
मार्च २०२३        १.२२ टक्के 

राज्यात बालकांमधील तीव्र कमी वजनाची टक्केवारी खाली येत असून, आदिवासीबहुल १६ जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे प्रमाण कमी होत असल्याचे फडणवीस म्हणाले. 

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सोडणार नाही
आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला ही वस्तुस्थिती नाही. औरंगजेबाचे पोस्टर्स, स्टेटस हा योगायोग नाही. तो देशातील मुस्लिमांचा हिरो कधीच होऊ शकत नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. 

पोलिस दलात १८,५५२ नवीन पदे 
- पोलिस दलात आता १,९६० ऐवजी २,०२३ नुसार नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. 
- शहरी भागात दोन पोलिस स्थानकांमधील अंतर चार किमीपेक्षा अधिक नसेल तर ग्रामीण भागात ते १० किमीपेक्षा अधिक नसेल याची काळजी घेण्यात येईल. 
- पोलिसांच्या १८,३३१ पदांची भरती सुरू असून, १८,५५२ पदांचा नवीन आकृतिबंध तयार करण्यात येणार आहे.

 

Web Title: Investment of 'that' company in Pakistan; Govt companies to build Barsu refinery says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.