दावोसमधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:49 AM2024-01-16T05:49:50+5:302024-01-16T07:07:44+5:30

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत.

Investment of two and a half lakh crores will be brought to the state from Davos; A delegation of ten officers will go along with the Chief Minister, Industries Minister | दावोसमधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार

दावोसमधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार

मुंबई : दावोस परिषदेच्या माध्यमातून राज्यात सुमारे अडीच लाख कोटींची प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलाद, माहिती तंत्रज्ञान,  आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत-ग्रीन हायड्रोजन,  हिरे व आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह  त्याचबरोबर 
कृषी-औद्योगिक, कृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यानुसार तीन लाख १० हजार कोटी रुपयांचे २० सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत. 

गतवर्षी १ लाख, ३७ हजार कोटींचे करार 
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्यावर्षी या परिषदेत  १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत.

शाश्वत विकासावर मुख्यमंत्र्यांचे भाषण 
१७ जानेवारीस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये ‘नागरी  क्षेत्रातील आव्हाने, नावीन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास’ या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले भाषण देतील. 
याशिवाय ‘कृषी, महिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात  सहभागी होतील.

कुठे येणार उद्याेग?
उद्योग राज्यात केवळ मुंबई, पुणे भागात न येता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड अशा सर्वदूर ठिकाणी येतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८ तारखेस ‘सीआयआय’ने गोलमेज परिषद आयोजित केली असून, त्याला  केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

महाराष्ट्राचे प्रभावी ब्रँडिंग करणार
१६ जानेवारीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. ओमानचे उद्योग मंत्री, सौदीचे वित्तमंत्री, दक्षिण आफ्रिकेचे ऊर्जामंत्री, दक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर, तसेच डीपी वर्ल्ड, लुईस ड्रेफस,  वित्कोविझ एटोमिका, या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्नप्रक्रिया गटाचे सदस्य देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Investment of two and a half lakh crores will be brought to the state from Davos; A delegation of ten officers will go along with the Chief Minister, Industries Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.